जम्मू-काश्मीर : चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नगनाद चिमर भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन अतिरेकी ठार मारले. 

Updated: Jul 17, 2020, 10:18 AM IST
जम्मू-काश्मीर : चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी
संग्रहित छाया

कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नगनाद चिमर भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन अतिरेकी ठार मारले. मात्र, अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात दोन ते तीन अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर सुरक्षा दलाने त्या भागात शोधमोहीम सुरु केली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. चकमकीला सुरुवात होण्यापूर्वी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली पण ते मान्य न झाल्याने त्यांनी गोळीबार सुरू केला.

यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, '९ आरआर आणि सीआरपीएफच्या पोलिसांच्या संयुक्त पथकाने या भागात दहशतवाद्यांबाबत विशेष माहिती मिळाल्यानंतर शोध घेतला आणि संपूर्ण परिसर घेरला. शोधमोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी शोधमोहीमेवर असणाऱ्या पथकावर गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युतराबाबत कारवाई केली गेली. यावेळी चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत तीन दहशदवाद्यांना ठार करण्यात यश आले.

 काश्मीरचे जिल्हे एकामागून एक दहशतवाद्यांपासून मुक्त होत आहेत. यावेळी काश्मीरमधील आपले अस्तित्व वाचवण्यासाठी दहशतवादी संघटना लढाई लढत आहेत. सुरक्षा दलाने यावर्षी १३३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. वृत्तानुसार, काश्मीरमध्ये ३५ ते ४० विदेशी दहशतवाद्यांसह जवळपास दोनशे अतिरेकी अद्याप सक्रिय आहेत.