10 वीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना ट्रकनं चिरडलं

10 वीची परीक्षा द्यायला परीक्षा सेंटरवर गेले पण घरी परतलेच नाहीत, काळानं भर रस्त्यात गाठलं 

Updated: Mar 6, 2022, 12:43 PM IST
10 वीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना ट्रकनं चिरडलं title=

रीवा : दहावीची परीक्षा द्यायला घरातून निघाले खरे पण घरी परतलेच नाहीत. परीक्षा देऊन घरी परत येत असताना रस्त्यात काळानं गाठलं. तीन भावांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने बाईकवरून जाणाऱ्या तीन जणांना चिरडलं आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हा भीषण अपघात मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी झाला. भरधाव ट्रकने बाईकला जोरदार धडक दिली.

भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ताज अन्सारी, रानू अन्सारी आणि  इश्मा अन्सारी अशी मृतांची नावं आहेत. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आलं असून वाहन जप्त करण्यात आलं आहे. 

महाष्ट्रातही पालघर जिल्ह्यात भीषण अपघात

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शनिवारी एका भरधाव ट्रकने महामार्गावर धडक दिली. त्यामुळे दोन मुलांचा चिरडून मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला. पालघर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मोखाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जव्हार-नाशिक महामार्गावर दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला हॉटेलजवळ बसलेल्या लोकांना धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.