नवी दिल्ली: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांच्या एक्झिट पोलची आकेडवारी समोर आली आहे. त्यानुसार राजस्थानमधील मतदारांनी भाजप व काँग्रेसला आलटून-पालटून सत्ता देण्याचा प्रघात कायम राखला आहे. त्यामुळे सत्ताधारी वसुंधरा राजे सरकारला पायउतार व्हावे लागणार आहे आणि सत्तेची सूत्रे काँग्रेसच्या हातात येतील.
टाईम्स नाऊ- सीएनएक्सच्या अहवालानुसार, विधानसभेच्या २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळेल. तर भाजपला ८५ जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय, बसपा २ व ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होतील, असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
राजस्थान विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांसाठी आज मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दुपारी पाच वाजेपर्यंत याठिकाणी तब्बल ७२ टक्के इतके मतदान झाले. राजस्थानचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहता कोणताही पक्ष सलग दोन टर्म सत्तेवर राहिलेला नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये यावेळी काँग्रेसची सत्ता येणार, असा अंदाज बांधला जात होता. एक्झिट पोलची आकडेवारी पाहता हे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत.
दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मात्र भाजपच पुन्हा सत्तेत येईल, असा दावा केला आहे.