नवी दिल्ली : आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन माघार घेणार असल्याचं जाहीर केलंय. पण, अण्णांच्या या सात दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा खर्च समोर आल्यानंतर आता त्यावरच चर्चा सुरू झालीय.
गेली सात दिवस उपोषणावर बसलेल्या अण्णांनी अन्न-पाण्याचा कणही घेतला नाही परंतु, तरीही या आंदोलनात फक्त जेवणासाठी दररोज दोन लाख रुपये खर्च होत होते. सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती कोअर टीममधील सदस्य नवीन जयहिंद यांनी दिलीय.
- मंडपाचा रोजचा खर्च ३ लाख रुपये
- टॉयलेटसाठी रोजचा खर्च १२ हजार रुपये
- जेवणाचा रोजचा खर्च २ लाख रुपये
- सात दिवसांसाठी आंदोलनाचा एकूण खर्च ३५ लाख
दरम्यान, दिल्लीच्या रामलीला मैदानावर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अण्णांच्या उपोषणाची आज दुपारी सांगता होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अण्णा आणि पंतप्रधान कार्यालयात निर्माण झालेला तिढा सोडवण्यात पुढाकार घेतला. मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झालेत. दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते रामलीला मैदानात येतील आणि तेव्हाच अण्णा त्यांचं उपोषण सोडणार आहेत.
दोन्ही बाजूंमध्ये समन्वय घडवून आणल्यानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच दुपारी अण्णा उपोषण सोडतील. लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याच्या अंमलबाजणी संदर्भात कालबद्ध कार्यक्रम असावा अशी अण्णांची मागणी होती. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचं घो़डं अ़डलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटला आहे.