मुंबई : देशात कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर आता काही समाजकंठक याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी अटक केलीये. वाराणसीमध्ये जप्त करण्यात आलेल्या बनावट कोरोना लस आणि चाचणी किटची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे.
यूपी पोलिसांना मोठे यश
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बनावट कोविड लस आणि चाचणी किट मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट कोरोना लस आणि बनावट चाचणी किट अनेक राज्यांमध्ये पुरवल्या जाणार होत्या. सुदैवाने, बनावट लसींचा पुरवठा होण्यापूर्वीच त्यांची निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
वाराणसीच्या रोहित नगरमध्ये बनावट लस बनवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बनावट कोविडशील्ड लस, बनावट ZyCoV-D लस आणि बनावट कोविड चाचणी किट मोठ्या प्रमाणावर जप्त केले.
5 आरोपींना अटक केली
पोलिसांनी राकेश थवानी, संदीप शर्मा, लक्ष्य जावा, समशेर आणि अरुणेश विश्वकर्मा यांना बनावट कोरोना लस तयार आणि पुरवल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
चौकशीत राकेश थवानी यांनी सांगितले की, तो संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि समशेर यांच्यासोबत बनावट लसी आणि चाचणी किट बनवत असे. ज्याचा पुरवठा वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या नेटवर्कद्वारे केला जाणार होता.
आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जप्त करण्यात आलेल्या औषधांची बाजारातील किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.