खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

Updated: Jul 14, 2022, 03:11 PM IST
खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या title=

मुंबई : आपल्याला कधीही किंवा कोणत्याही वेळेला पैशांची गरज लागली तर बँकेत न जाता पैशे काढण्याचा एक पर्याय म्हणजे ATM. परंतु आता यासंदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात संभ्राम निर्माण झाला आहे. याबातमीमध्ये सोशल मीडियावर एक असा संदेश फिरत आहे, ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एटीएममधून वारंवार पैसे काढल्याने तुमच्या खिशावर अधिक भार पडू शकतो. कारण यापुढे दर महिन्याला 5 मोफत व्यवहारांचा लाभ घेऊ शकणार आणि त्यानंतर जर तुम्ही पैसे काढले तर जास्तीचे शुल्क लावले जाणार आहे. चला या संदेशची सत्यता तपासू या.

सुरुवातीला आपण सोशल मीडियावर नक्की कोणता मेसेज व्हायरल होत आहे हे पाहू

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. मेसेजमध्ये लिहिले आहे की, "एटीएममधून 4 पेक्षा जास्त पैसे काढल्यास, ₹150 टॅक्स आणि ₹23 सर्विस टॅक्सेससह एकूण ₹173 कापले जातील. तसेच 1 जूनपासून, बँकेत 4 व्यवहार केल्यानंतर, ₹150 शुल्क आकारले जाईल."

या मेसेजवर सरकारचं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजची दखल घेत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलने ती शेअर करून स्पष्टीकरण जारी केले आहे. हँडलने ट्विट केले की, "एटीएममधून 4 पेक्षा जास्त पैसे काढल्यास ₹173 कापले जातील. हा दावा खोटा आहे. तसेच तुमच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा 5 विनामूल्य व्यवहार केले जाऊ शकतात. त्यानंतर जास्तीत जास्त ₹21/व्यवहार किंवा कोणताही कर असल्यास, तो वेगळा द्यावा लागेल."

तसेच यापूर्वी सोशल नेटवर्किंग ऍप व्हॉट्सऍपवर आणखी एक फेक मेसेज व्हायरल झाला होता. या मेसेजमध्ये लिहिले होते की, "प्रधानमंत्री बेरोजगार भट्टा योजनेअंतर्गत, भारत सरकार सर्व बेरोजगारांना दरमहा 3 हजार 500 रुपये देत आहे."

हा दावा खोटा असल्याचे सरकारने म्हटलंय

या वेगाने व्हायरल होत असलेल्या संदेशाची दखल घेत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलने ते शेअर करून स्पष्टीकरण जारी केले होते.

त्यांनी ट्विटवर मेसेज पाठवला की, "एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारत सरकार 'प्रधानमंत्री रोजगार भट्टा योजने' अंतर्गत सर्व बेरोजगारांना दरमहा ₹ 3 हजार 500 देत आहे. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले आहे की, हा दावा करण्यात आलेला ब्लॉग आणि लिंक ही बनावट आहे.  अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही."

सोशल मीडियावर सध्या बरेच फेक मेसेज आणि लिंक व्हायरल होत असतात. त्यावर विश्वास ठेवू नका. यामुळे तुमचेच नुकसान होते. तसेच कोणत्याही लिंक वर क्लिक करु नका, कारण यामुळे तुमची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.