Fake Potato Vs Real Potato: बाजारामध्ये नकली बटाटा आला आहे असं तुम्हाला सांगितल्यास नकली बटाटा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र खरोखरच असा प्रकार घडत असून अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही. खऱ्या बटाट्यांबरोबर खोटे बटाटे मिक्स करुन ते बाजारात विकले जात आहेत. मात्र यासंदर्भातील माहिती ग्राहकांना आणि सर्वसामान्यांना नाही. बाजारामध्ये 'हेमांगिनी' किंवा 'हेमालिनी' प्रजातीचे बटाटे 'चंद्रमुखी' बटाट्यांच्या दरात विकले जात आहेत. हे बटाटे दिसायला चंद्रमुखी प्रजातीच्या बटाट्यांसारखे असले तरी त्यांची चव फारच विचित्र आहे.
मात्र हे खरे आणि खोटे बटाटे एकत्र ठेवल्यास त्यांच्यातील फरक समजणं कठीण आहे. बाजारामध्ये 'चंद्रमुखी' बटाटा 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर 'हेमांगिनी' बटाटा 10 ते 12 रुपये प्रति किलोने विकाला जात आहे. अनेकदा छोट्या गाड्यांमध्ये 5-5 किलोच्या गोणींमध्ये स्वस्त बटाटा म्हणून हे बटाटे विकले जातात. मात्र काही व्यापारी या 'हेमांगिनी' बटाट्यांना दर्जेदार 'चंद्रमुखी' बटाट्यांबरोबर एकत्र करुन विकत आहेत. याचमुळे जास्त पैसे मोजूनही हे कमी दर्जाचे म्हणजेच नकली 'हेमांगिनी' बटाटे लोकांना विकले जात आहेत.
हुगळी कृषी सहकारी समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार 'हेमांगिनी' बटाटे हे मिश्र प्रजातीचे बटाटे आहेत. या बटाटांचं उत्पादन पंजाबमधील वेगवेगळ्या भागांमध्ये घेतलं जाते. या बटाट्याचं बीज हे इतर राज्यांमधून पंजाबमध्ये येतं. या बटाट्याची शेती हुगळीमधील वेगवेगळ्या भागांमध्ये होते. या बटाट्याच्या बीजीपासून मोठ्या प्रमाणात फळ मिळतं. एका एकरामध्ये 150 ते 180 गोणी 'चंद्रमुखी' बटाट्याचं उत्पादन होतं. हेच प्रमाण 'हेमांगिनी'बाबत एक एकराला 270 ते 285 गोणी इतकं आहे. मात्र बाजारपेठेत या हलक्या दर्जाच्या 'हेमांगिनी' बटाट्याला कमी मागणी आहे. हे बटाटे लवकर शिजत नाहीत. तसेच या बटाट्यांची चवही फारशी चांगली नाही.
हुगळीतील कृषी अधिकारी मनोज चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शहरांमधील लोकांना 'हेमांगिनी' बटाटा आणि 'चंद्रमुखी' बटाट्यामध्ये फरक लगेच कळत नाही." 'हेमांगिनी' बटाट्याचं उत्पादन हे 'चंद्रमुखी' बटाट्याबरोबर क्रॉस ब्रिडींग करुन घेतलं जातं. 'हेमांगिनी' बटाटा हा क्रॉस ब्रिडींग प्रोडक्ट असल्याने तो कमी वेळेत, कमी पैशांमध्ये उत्पादन घेता येण्यासारखा आहे. 'हेमांगिनी' बटाट्याचं उत्पादन हुगळीमधील पुरशुरा आणि तारकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. 'चंद्रमुखी' बटाटा हा 3 ते 4 महिन्यांमध्ये हाताशी येतो तर 'हेमांगिनी' हायब्रिड बटाटा अवघ्या दीड ते 2 महिन्यांमध्ये तयार होते. म्हणजेच एकाच सिझनमध्ये दोन वेळा हे पिक घेता येतं. हायब्रिट बटाट्याचं प्रोडक्शन दरही अधिक आहे.
'हेमांगिनी' बटाट्याला अनेक व्यापारी 'चंद्रमुखी' बटाटा नावाने विकतात. गावाकडी लोकांना या दोन्ही प्रजातींमधील फरक लगेच कळतो. मात्र शहरांमध्ये हा फरक लगेच कळून येत नाही. त्यामुळेच व्यापारी या अज्ञानाचा फायदा घेतात.
कृषी निर्देशक मनोज चक्रवर्तींनी दिलेल्या माहितीनुसार, "वरवर पाहता दोन्ही प्रजातीचे बटाट्यांमधील फरक लवकर समजत नाही. दोन्ही बटाट्यांचं साल हे पातळ असतं. मात्र दोन्हींमधील फरक दोन मुख्य गोष्टींमधून कळतो. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रजातीचे बटाटे साळल्यानंतर त्यांचा रंग हा वेगवेगळा असल्याचं दिसतं. 'चंद्रमुखी' बटाट्याचा रंग हा हलकासा मळकट असतो तर 'हेमांगिनी' बटाटा हा सफेद असतो. दुसरी गोष्ट म्हणजेच चव घेऊन कोणता बटाटा चांगला आहे हे समजू शकतं. 'हेमांगिनी' बटाट्याला अजिबात चव नसते. हा बटाटा पूर्णपणे पिकलेला नसतो."