टोकदार तारा, पोलीस पहारा आणि...; शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

Farmers Protest In Delhi: दोन वर्षांपूर्वी ज्या शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला होता तोच वणवा आता पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 12, 2024, 11:11 AM IST
टोकदार तारा, पोलीस पहारा आणि...; शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त  title=
farmers protest latest update delhi news traffic police issues advisory news in marathi

Farmers Protest In Delhi: पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आल्यामुळं आता देशात आणखी धुमसती ठिणगी वणव्याचं रुप धारण करणार असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पंजाब आणि हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र येत या संघटनांनी आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत. शेतमालाला हमीभाव मिळवा यासह इतर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. 

उद्या 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. हरियाणा लगतच्या टिकरी बॉर्डर, डबवाली बॉर्डर आणि सिंधू बॉर्डरवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण 

बॅरिकेटिंगसह इथं मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर, कुठं टोकदार तारेचं कुंपण घालत शेतकऱ्यांची वाट अडवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत सोमवारी चर्चा होणार असल्याचा दावा शेतकरी नेते सरवन सिंघ पांढेर यांनी केला, तर पियुष गोयल, अर्जुन मुंडे आणि नित्यानंद राय हे चर्चा करण्यासाठी चंदिगढला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावं, शेतकरी आणि शेतमजुरांना कर्जमाफी मिळावी अशा अनेक मागण्या शेतकरी वर्गानं उचलून धरल्या आहेत. 

दिल्लीच्या 'या' भागांमध्ये जमावबंदी 

शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांकडून दिल्लीच्या अनेक भागांमध्ये वाहतुकीवर होणारे परिणाम पाहता प्रशासनाच्या वतीनं काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. नॉर्थ ईस्ट दिल्लीसोबतच शाहदरा जिल्ह्यातील फर्श बाजार, गांधी नगर, विवेक नगर, सीमापुरी अशा भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमृतसर व्यास येथून मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करण्यासाठी सज्ज असून सध्या या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरही एका लांबलचक रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर यंत्रणांकडून वॉटर कॅनन आणि वज्र वाहनं तैनात करण्यात आली आहेत. वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी इथं घग्गर नदीच्या तळाशी खोदकाम करण्यात आलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 11 ते 13 फेब्रुवारीपर्यंत अंबाला, कुरूक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसासह सात जिल्ह्यांमध्ये मोबाईल, इंटरनेट सेवा आणि बल्क एसएमएस तूर्तास निलंबित केले आहेत.