जयपूर : पतंजलीच्या विविध प्रॉडक्टची सध्या भारतीयांमध्ये खूप क्रेज निर्माण झाली आहे. पतंजलीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. अशातच पतंजलीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. पतंजली मैदा विरहित बिस्किटे असल्याची जाहीरात करीत असताना त्यात मैदा आढळून आल्याने पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रामदेव बाबांनी राजस्थानच्या हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना तक्रारदार आणि राजस्थान सरकार यांना नोटीसा पाठवून उत्तर मागवले आहे राजस्थानच्या हायकोर्टाचे न्यायाधीश दीपक माहेश्वरी यांनी हे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात एस. के. सिंह नावाच्या व्यक्तीने पतंजली बिस्किटांमध्ये मैदा असल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, पतंजलीने आपली बिस्किटे ही मैदा विरहित असल्याची जाहीरात केली आहे. या बिस्किटांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यात प्राणीजन्य पदार्थही आढळून आले आहेत. त्यामुळे जयपूरच्या जालूपूरा पोलिस ठाण्यात रामदेव बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रामदेव बाबा यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.