नवी दिल्ली: आगामी पाच वर्षात देशभरात १०२ लाख कोटीचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्र सरकारकरडून करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी म्हटले की, केंद्राकडून स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने सप्टेंबर महिन्यात ही समिती स्थापन केली. या समितीने चार महिन्यात संबंधितांशी चर्चा करून केंद्र सरकारला पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आडाखा केंद्र सरकारपुढे सादर केला होता.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, यामध्ये आणखी ३ लाख कोटीची भर पडली आहे. या नव्या प्रकल्पांचा प्रत्येकी ३९ टक्के खर्च केंद्र व राज्य सरकार करेल. तर उर्वरीत २२ टक्के खर्च खासगी कंपनीच्या माध्यमातून केला जाईल, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यापैकी बहुतांश प्रकल्प उर्जा, रेल्वे, नागरी सुविधा, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील असतील.
FM Nirmala Sitharaman: Today, the task force has identified Rs 102 lakh crore worth of projects, after conducting 70 stakeholder consultations in a short period of four months https://t.co/q6KMttF2vw
— ANI (@ANI) December 31, 2019
तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीत समन्वय राखण्यासाठी केंद्र सरकारकडून नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) या यंत्रणेची निर्मिती करण्यात येईल. या माध्यमातून एखाद्या प्रकल्पाची आखणी, जनजागृती आणि निर्णयांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यात येईल.