यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचेसह १७ जणांविरुद्ध अवधुतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. खोट्या कागदपत्राद्वारे प्लॉट ची खरेदी केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यवतमाळ चे विद्यमान प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. पालकमंत्री मदन येरावार व अमित चोखाणी यांना भाजप चे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे यांच्या कुटुंबीयांनी खोटे कागदपत्र तयार करून मालमत्ता हस्तांतरित केली.
याकरिता तत्कालीन भूमिअभिलेख उपअधिक्षक, यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी व सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी सहकार्य केल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. याप्रकरणी आयुषी किरण देशमुख यांची फिर्याद असून फिर्यादीचे दिवंगत वडिलांची ही मालमत्ता असताना ती खोटे दस्तावेज तयार करून हडप केली आणि शासनाला देखील नुकसान पोहोचविले अशी फिर्यादीची तक्रार आहे. याप्रकरणी शासकीय पोर्टल, अवधूतवाडी पोलीस आणि विशेष तपास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने फिर्यादी आयुषी देशमुख ह्यांनी विद्यमान न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
अवधुतवाडी पोलिसांनी पालकमंत्री मदन येरावार, भाजप जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, काँग्रेस चे माजी मंत्री संजय देवतळे यांची पत्नी राजश्री, नगर परिषद चे तत्कालीन मुख्याधिकारी, भूमी अभिलेख चे उपअधीक्षक, दुय्यम निबंधक अशा एकूण १७ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे। या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.