‘मरकज आयोजकांकडून आदेशाचं उल्लंघन, लोकांचा जीव धोक्यात घातला’

निजामुद्दीन प्रकरणात एफआयआरमध्ये ही धक्कादायक माहिती

Updated: Apr 2, 2020, 07:33 PM IST
‘मरकज आयोजकांकडून आदेशाचं उल्लंघन, लोकांचा जीव धोक्यात घातला’ title=

दिल्ली : निजामुद्दीनमध्ये तबलीगी ए जमातच्या मरकज धार्मिक कार्यक्रमात जमलेल्या लोकांमुळे देशभरात कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एफआयआर दाखल करून घेतला आहे.

पोलिसांच्या तक्रारीत म्हटलं आहे की मरकजमधील सात जणांनी लॉकडाऊनच्या आदेशांचं उल्लंघन केलं आणि सरकारी आदेश असतानाही एका इमारतीत ५० हून अधिक लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र राहिले. २१ मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी मरकज आयोजकांना संपर्क साधला आणि मुफ्ती शहजाद यांना कोरोनाच्या बाबतीत समजावून सांगितलं. मरकजसाठी आलेल्या लोकांना तातडीने पाठवून द्यावे, परदेशातून आलेल्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवावे, भारतातील लोकांना त्यांच्या घरी पाठवावे, अशी सूचना पोलिसांनी मरकजच्या आयोजकांना केली होती.

पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

मरकज आयोजकांनी पोलिसांचं म्हणणं ऐकलं नाही, असं पोलिसांच्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक ऑडिओ उपलब्ध झाला आहे, जो तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांचा असण्याची शक्यता आहे. त्यात त्यांनी त्यांच्या अनुयायांना लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पाळू नका, असं सांगितलं आहे आणि मरकजमध्येच एकत्र थांबण्यास सांगितल्याचं पोलीस तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे.

मरकज पदाधिकाऱ्यांनी ना माहिती दिली, ना नोटिशीला उत्तर दिलं....

त्यानंतर सरकारनं २४ मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊनचा आदेश जाहीर केला. २४ मार्चलाच निजामुद्दीन पोलीस स्टेशनमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीत मोहम्मद अशरफ, मोहम्मद शहजाद, डॉक्टर जीशान, मुरस्लिन सैफी, मोहम्मद सलमान, एम युनुस आणि मौलाना मोहम्मद साद या सर्वांना लॉकडाऊन आणि सोशल सिस्टसिंग यांचं पालन करायचं आहे हेदेखिल सांगितलं गेलं. पण मरकजमध्ये एवढे लोक लोक एकत्र आहेत याची माहिती मरकजच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग किंवा कोणत्याही सरकारी विभागाला दिली नाही. २८ मार्चला पोलिसांनी मरकज पदाधिकाऱ्यांना नोटिस पाठवली होती. पण त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

लोकांचा जीव धोक्यात घातला

मरकजमधील १३०० लोक २६ के ३० मार्च दरम्यान एकत्रच राहात होते. त्यात भारतीय आणि परदेशी नागरिकही होते. त्यांनी कोणतंही सोशल डिस्टसिंग फॉलो केलं नाही. एवढंच काय तर ते मास्क किंवा सेनिटायझरचाही वापर करत नव्हते. मरकजच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना पसरत असताना कुणालाही मास्क किंवा सेनिटायझर उपलब्ध करून दिलं नाही. त्यांच्या या कृत्यानं तिथं राहणाऱ्या आणि इतर सामान्य लोकांचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे मौलाना मोहम्मद साद आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी दिल्ली पोलीस एसएचओ मुकेश वालिया यांनी गुन्हा शाखेकडे नोंदवलेल्या तक्रारीत केली आहे.