नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळला, गोवा एअरपोर्टवर आग

या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि इथून उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय

Updated: Jun 8, 2019, 04:01 PM IST
नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळला, गोवा एअरपोर्टवर आग title=

पणजी, गोवा : गोवा विमानतळावर शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना समोर आलीय. विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर नौसेनेच्या मिग २९ विमानाचा 'ड्रॉप टँक' अचानक जमिनीवर कोसळला. विमानाच्या बाहेरील बाजुवर लावण्यात आलेल्या फ्युएल टँकला ड्रॉप टँक म्हटलं जातं. यामध्ये अतिरिक्त इंधन भरून ठेवलं जातं. 'ड्रॉप टँक' कोसळल्यामुळे विमानतळावर आग लागली. सुदैवानं या घटनेत अद्याप कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. 

परंतु, या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि इथून उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय. सध्या सर्व विमानांची उड्डाणं आणि लँन्डिंग थांबवण्यात आलंय. 

नौसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर वाहतुकीवर परिणाम झालाय. परंतु, लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, नौसेनेचं मिग २९ हे विमान सुरक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.