सुष्मिता भदाणे, झी मीडिया मुंबई : मागील वर्षी २९ मे ला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र यंदा मात्र देवभूमी केरळमध्ये पाऊस काहीसा उशीराने आज दाखल झाला आहे. सध्या नैर्ऋत्य मोसमी वारे हे दक्षिण अरबी समुद्रात १० अंशावर असून ही स्थिती पावसासाठी पुरक आहे. अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाऱ्यांनी प्रगती केली आहे.
विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ३.६ किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र सक्रीय आहेत. महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली आहे. केरळमध्ये दाखल झालेला पाऊस येत्या ३-४ दिवसात कर्नाटक, गोवा, तळ कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे.
एकीकडे मान्सूनचे आगमन झाले असले तरी विदर्भा मराठवाड्यात आणि मध्यमहाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत १४ जूननंतर पावसाच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समुद्रावर वाऱ्यांच्या बदलानुसार मान्सूनचे आगमन अवलंबून असते. त्यातील बदलानुसार पावसाचे आगमन ठरते. महाराष्ट्रात पावसाचे प्रत्यक्ष आगमन झाल्यानंतरच विस्तारित पाऊस अनुमानाच्या आधारे पेरण्या उशिरा करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी १४ जूनपर्यंत थांबावे लागेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.