एका क्षणात घर उद्ध्वस्त; महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील 5 जण बुडाले

अनेक तास चाललेल्या बचावकार्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले

Updated: Nov 15, 2022, 09:09 AM IST
एका क्षणात घर उद्ध्वस्त; महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील 5 जण बुडाले title=

सोमवारी, गुजरातमधील कच्छ (Gujarat Kutch) जिल्ह्यात नर्मदा कालव्यात (Narmada canal) एका किशोरवयीन मुलासह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडाळा गावाजवळ संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. दोन महिला, एक 15 वर्षांची मुलगी आणि दोन पुरुषांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले आहेत, असे स्थानिक प्रागपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. एका महिलेला वाचवताना एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. अनेक तास चाललेल्या बचावकार्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. (five people same family drowned in Narmada Canal) 

कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी सांगितले की, कच्छमधील नर्मदा कालव्यात एका महिलेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. पाणी आणण्यासाठी गेलेली महिला कालव्यात पडली होती. यानंतर तिला वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांनी कालव्यात उडी घेतली. या नंतर सर्वच जण कालव्यात बुडाले. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका 15 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

नर्मदा कालव्याचे पाणी सरदार सरोवर धरणातून गुजरातमध्ये आणि नंतर राजस्थानमध्ये आणले जाते. मुख्य कालव्याची लांबी 532 किलोमीटर असून त्यापैकी 458 किलोमीटर गुजरातमध्ये आणि 74 किलोमीटर राजस्थानमध्ये आहे. निसरड्या उतारांमुळे नर्मदा कालव्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच पाण्याचे जोरदार प्रवाह आणि शेवाळे यामुळे पोहोण्यात पटाईत असणाऱ्यांनाचाही यापुढे निभाव लागत नाही.