नवी दिल्ली : गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण गुजरातमधल्या पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी काँग्रेसचे ४४ आमदार बंगळुरूला गेले आहेत. या मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पूरग्रस्तांना मदत करायची सोडून काँग्रेस आमदार बंगळुरूत मजा करत असल्याचं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भगदाड पडण्यास सुरुवात झालीय. आतापर्यंत काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिलाय. त्यामुळं पक्षाला अधिक फटका बसू नये आणि फूटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ४४ आमदारांना बंगळुरुला पाठवलंय.
राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत या सर्व आमदारांना बंगळुरुतल्या रिसोर्टमध्ये ठेवण्यात आलंय. राज्यात येत्या वर्षअखेर विधानसभेच्या निवडणुका होणार असून गेल्या तीन निवडणुकांत पक्षाचा मोठा पराभव झालाय.
गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी गुरुवारी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे गुजरातमधून काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवणारे अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झालीय.