वायूदलाच्या महत्त्वाच्या तळांवर दहशतवादी हल्ल्याचा कट उघड; काश्मीरमध्ये लष्कर हाय अलर्टवर

पाकिस्तानच्या विमानांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या या विमानांनी श्रीनगरच्या तळावरून उड्डाण केले होते.

Updated: May 17, 2019, 11:07 PM IST
वायूदलाच्या महत्त्वाच्या तळांवर दहशतवादी हल्ल्याचा कट उघड; काश्मीरमध्ये लष्कर हाय अलर्टवर title=

श्रीनगर: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी गुरुवारी झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कराला काही नकाशे मिळाले होते. हाताने रेखाटलेले हे नकाशे श्रीनगर आणि अवंतीपोरा येथील वायदूलाच्या तळाचे असल्याची माहिती प्राथमिक तपासणीतून पुढे आली. त्यामुळे आगामी या काळात वायूदलाच्या या तळांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी भारताच्या मिग बायसन २१ आणि सुखोई एमकेआय ३० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना पिटाळून लावले होते. एवढेच नव्हे तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग बायसन २१ विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे अद्यायावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे एफ १६ विमान पाडण्याचा पराक्रम करून दाखवला होता. 

पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच भारताची लढाऊ विमाने हवेत झेपावली होती. या विमानांनी श्रीनगरच्या तळावरून उड्डाण केले होते. त्यामुळे दहशतवादी आता या हवाई तळाला लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर खोऱ्यात गुरुवारी झालेल्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांकडून हाताने रेखाटलेले काही नकाशे हस्तगत केले होते. या नकाशांचा अभ्यास केल्यानंतर हे नकाशे श्रीनगर आणि अवंतीपोरा हवाई तळाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दहशतवादी या दोन तळांवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या तळांच्या परिसरात असणाऱ्या लष्करी तुकड्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.