जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

या चकमकी दरम्यान सेनेचे जवान संदीप शहीद झाले तर एक स्थानिक नागरिक रईस डार यांचाही यात मृत्यू झाला

Updated: May 17, 2019, 09:52 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलानं दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई यशस्वी केलीय. गुरुवारी पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झालेत. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचाही समावेश आहे. दुसरीकडे, ही कारवाई सुरू असताना सेनेचे दोन जवान आणि एका नागरिकालाही आपले प्राण गमवावे लागलेत. 

पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेलेत तर एक सैनिक आणि एका नागरिकही यावेळी बळी गेलाय.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस आणि सुरक्षा दलानं सकाळी पुलवामा जिल्ह्यातील डेलीपुरा भागात घेराबंदी करून शोध अभियान सुरू केलं होतं. घटनास्थळावर सुरक्षा दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या दरम्यान सेनेचे जवान संदीप शहीद झाले. तर एक स्थानिक नागरिक रईस डार यांचाही यात मृत्यू झाला. 

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलानं गोळीबारानंच प्रत्यूत्तर दिल्यानं चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत. करीमाबाद-पुलवामाचा रहिवासी नसीर पंडित, शोपियाचा रहिवासी उमर मीर आणि पाकिस्तानचा खालिद अशी या तिघांची ओळख पटलीय.

मारले गेलेले तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत होते. नसीर पंडित याचा 'जैश'मध्ये सहभागी होण्यापूर्वीपासून दहशतवादी कारवायांचा रेकॉर्ड आहे. अनेक षडयंत्रात त्याच्याविरोदात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. 

पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये ईदच्या पूर्वसंध्येला पुलवामाचा पोलीस कर्मचारी मोहम्मद याकूब शाह याची हत्या झाली होती. या हत्येतही नसीर पंडितचा हात होता. संवेदनशील भागांतून हत्यारं चोरण्याच्या घटनांमध्येही तो सामील होता. तर सध्या तो जैशचा कमांडर म्हणून दहशतवादी कारभार हाताळत होता. सुरक्षा दलावर तसंच सामान्य नागरिकांवर हल्ले करण्याच्या त्यानं अनेक योजना आखल्या होत्या. 

आज झालेल्या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात हत्यारं-दारुगोळा आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापरली जाणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या.