जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशभर शोक, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Updated: Jan 29, 2019, 10:42 AM IST
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशभर शोक, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली title=

नवी दिल्ली - आपल्या समाजवादी विचारांशी शेवटपर्यंत प्रामाणिक असलेले ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जॉर्ज फर्नांडिस निर्भिड आणि स्पष्ट विचारांचे होते. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. गरिबांच्या आणि शोषितांच्या अधिकारांसाठी त्यांनी उठवलेला आवाज परिणामकारक होता. त्यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा लढवय्या नेता अशीच त्यांची ओळख होती, अशी आठवण नितीश कुमार यांनी सांगितले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना नितीश कुमार यांनी केली.

 

जॉर्ज फर्नांडिस यांनी वेगवेगळ्या मंत्रालयांचा कारभार सक्षमपणे हाताळून एकप्रकारे देशसेवा केली. अनेक कामगार चळवळींचे नेतृत्त्व त्यांनी केले होते आणि कामगारांना न्याय मिळवून दिला होता. संरक्षण मंत्री म्हणून त्यांची कामगिरी केवळ लक्षणीय होती, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले होते. माझ्यासाठी ते एक आदर्श नेते होते, असे केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.