नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची तब्येत बिघडलीय. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अरुण जेटली रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाच्या आयसीयूमध्ये दाखल असल्याचं समजतंय. अरुण जेटली यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयानं अरुण जेटलींच्या तब्येतीची माहिती दिलीय. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरुण जेटली यांना सकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या जेटलींच्या तब्येतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, अरुण जेटलींच्या स्वास्थ्याबद्दल माहिती मिळताच गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला एम्समध्ये दाखल झाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीनं एम्स रुग्णालय गाठलं. त्यानंतर अरुण जेटलींच्या प्रकतीची चौकशी करून ते रुग्णालयातून बाहेर पडले.
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at All India Institute of Medical Sciences (AIIMS) where Former Finance Minister Arun Jaitley has been admitted pic.twitter.com/nW91PEEl25
— ANI (@ANI) August 9, 2019
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास त्यांना जाणवत होता. आज सकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर तपासणीसाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलंय.
अरुण जेटली हे सध्या 'सॉफ्ट टिशू कॅन्सर'शीही दोन हात करत आहेत. त्यांच्या डाव्या पायाला सॉफ्ट टिशू कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. यावर उपचार घेण्यासाठी याच वर्षी जानेवारी महिन्यात ते अमेरिकेलाही गेले होते. तसंच गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्रक्रियाही पार पडली होती.
रुटीन चेकअपसाठी जेटली यांना रुग्णालयात भरती केल्याचं सांगण्यात येत असलं तरी नेमकं जेटली यांना काय त्रास होतोय ज्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावं लागलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या वर्षी अरुण जेटली यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्टची शस्रक्रिया पार पडली होती.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्रीपद भूषवल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र त्यांनी आपला मंत्रिमंडळात समावेश न करण्याची विनंती केली. मोदी सरकारमधील नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय अरुण जेटली अर्थमंत्री असतानाच लागू करण्यात आले, हे विशेष
उल्लेखनीय म्हणजे, याच आठवड्यात ६ ऑगस्ट रोजी भाजपानं ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना गमावलंय. परंतु, अरुण जेटली मात्र लवकरात लवकर बरे होऊन घरी परतावेत, अशी प्रार्थना सगळेच करत आहेत. अरुण जेटलींचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला. १९९१ पासून ते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.