नवी दिल्ली : आपल्या हटके ट्विटमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. जनावरांचं अस्तित्व धोक्यात टाकून होत असलेला विकास किती उचित आहे? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. जंगलातून जाणाऱ्या हायवेमुळे अनेक जनावरांना भरदाव गाडीखाली आल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. यावरचा उपाय म्हणून आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना एक कल्पना दिली.
आनंद महिंद्रा यांनी नॉर्वेचे डिप्लोमॅट आणि माजी नेते एरिक सोलहीम यांचं एक ट्विट शेयर केलं आहे. या ट्विटमध्ये नेदरलँडच्या जंगलामधल्या एका ब्रीजचा फोटो आहे. या ब्रीजच्या माध्यमातू जंगलातली जनावरं हायवेच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. रस्ता क्रॉस करण्यासाठी या जनावरांना हायवेवरून जाऊन जीव धोक्यात घालण्याची गरज पडत नाही. यामुळे जनावरांचा जीवही वाचतो आणि विकासही थांबत नाही.
नितीन गडकरीजी तुम्ही अशाप्रकारचा हायवे बांधलात तर आम्ही उभे राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवू, असं आनंद महिंद्रा म्हणाले. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला नितीन गडकरी यांनीही प्रतिक्रिया दिली. 'आम्ही एनएच-४४ वर सियोनी (मध्यप्रदेश) आणि नागपूरमध्ये एक ऍनिमल कॉरिडोर विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे परिणाम चांगले आले आहेत. भविष्यातही मनुष्य आणि जनावरांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी आम्ही पावलं उचलणार आहोत,' असं गडकरी म्हणाले.