We The People! एक भारतीय म्हणून 'हा' फोटो पाहून तुम्हालाही लाज वाटेल

IAS अधिकारी  अवनिश शरन यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी कचरा केल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी संताप आणि नाराजी व्यक्त करत आहेत.   

Updated: Jan 28, 2023, 02:13 PM IST
We The People! एक भारतीय म्हणून 'हा' फोटो पाहून तुम्हालाही लाज वाटेल title=

Garbage in Vandhe Bharat Express: नुकताच आपण सर्वांनी 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) साजरा केला. सफेद कपड्यांमध्ये हातात झेंडा घेतलेल्या, छातीवर तिरंगा लावून फिरणाऱ्या त्या अनेक चेहऱ्यांमध्ये आपणही होतोच. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपण जन्मलो याचा सार्थ अभिमान प्रत्येक नागरिकाला आहे. पण एक भारतीय म्हणून आपली ओळख सांगताना आपण देशाप्रती आपली कर्तव्यं पार पाडतो का याचा विचारही करणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झालेला एक फोटो आहे. 

'वंदे भारत'मधील फोटो व्हायरल 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लोकार्पण झालेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Vande Bharat Express) एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक सफाई कर्मचारी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी टाकलेला कचरा साफ करताना दिसत आहे. प्रवाशांनी केलेली ही घाण पाहून अनेक नेटकरी खंत व्यक्त करत असून भारतीय म्हणून आपली मान शरमेनं खाली घातल्याचं सांगत आहेत. 

आयएएस अधिकारी अवनिश शरन (IAS Officer Awanish Sharan) यांनी ट्विटरला हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रवाशांनी एक्स्प्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे कंटनेर, प्लास्टिक बॅग टाकून देत कचरा केल्याचं दिसत आहे. अवनिश शरन यांनी हा फोटो शेअर करताना 'We The People' अशी कॅप्शन दिली आहे. 

नेटकरी नाराज

अवनिश शरन यांनी फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "सर आपल्या देशात लोकांना त्यांची कर्तव्यं माहिती नाहीत, पण हक्क माहिती आहेत. लोकांनी स्वच्छतेसाठी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे," असं एका युजरने म्हटलं आहे.

"आपण नेहमी चांगल्या सुविधा आणि पायाभूत सुविधांची मागणी करतो. पण आपल्या देशातील लोकांना त्या सुविधा योग्य स्थितीत कशा ठेवाव्यात याची जाण नाही," असं म्हणत एका युजरने खंत व्यक्त केली आहे. 

हे पाहून फार वाईट वाटत असल्याचं एका युजरने लिहिलं आहे.

काही युजर्सनी प्रत्येकाने देशाला स्वच्छ ठेवलं पाहिजे असं आवाहन केलं आहे. 

एका युजरने कमेंट केली आहे की "जोपर्यंत आपल्यात काही मुलभूत नागरी भावना तयार होत नाहीत तोवर या विकासाचा काही फायदा नाही. एक जबाबदार नागरिक व्हा".

दरम्यान काहींनी ही समस्या सोडवण्याची विनंती केली आहे. "जर लोकांना त्यांची बाटली आणण्याची परवानगी दिली तर इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा प्लास्टिकचा वापर आणि कचरा टाळता येईल," असा सल्ला एकाने दिला आहे. 

महिन्याच्या सुरुवातीला सिकंदराबाद-विखाशापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कचरा आढळल्यानंतर रेल्वेने प्रवाशांना ट्रेनच्या आत स्वच्छता राखा असं आवाहन केल होतं. “स्वच्छता ही स्वतःची आणि आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रक्रिया आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासासाठी नागरिकही जबाबदार असतात. ती तुमचीही मालमत्ता आहे,” असं वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप सत्पथी यांनी म्हटलं आहे. 

"आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. स्वच्च रेल-स्वच्छ भारतचं स्वप्नं अशाने पूर्ण होणार नाही. रेल्वेला सहकार्य करा आणि कचरा करु नका," असंही ते म्हणाले आहेत.