गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक जण कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात

नवीन कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आणि हत्येच्या सरावासाठी शिबिराची व्यवस्था केल्याचा नवीन कुमार यांच्यावर आरोप आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 3, 2018, 08:13 AM IST
गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक जण कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात title=

बंगळुरू : प्रसारमाध्यमांसह देशभरात एकच खळबळ उडवून देणाऱ्या ज्येष्ठ महिला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) एकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा हिंदू युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

हत्येसाठी सराव शिबिराचे आयोजन

नवीन कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आणि हत्येच्या सरावासाठी शिबिराची व्यवस्था केल्याचा नवीन कुमार यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी आरोपी नवीन कुमार याला सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची कोठडी सुनावली. नवीन कुमार हा मांड्या जिल्ह्यातील मद्दूर येथील रहीवासी असल्याचे समजते.

दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्येला पाच महिने उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता. मात्र, विशेष पथकाने ताब्यात घेतलेल्या नवीन कुमारकडून धागेदोरे हाती लागल्यास लंकेश यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

नवीन कुमारकडे शस्त्रंही सापडली

आरोपी नवीन कुमार याला कर्नाटक पोलिसांनी गेल्याच आठवड्यात बंगळुरू येथील मॅजेस्टीक भागातील परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाजवळून तब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे एक ३२ कॅलिबर बंदूक आणि १५ जिवंत काडतूसे सापडली.

डॉ. दाभोलकर, काँ. पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचे गुढ उकलणार?

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत लंकेश यांच्या हत्येत नवीन कुमार याचा सहभाग आढळून आल्याचा दावा केला जात आहे. जर या दाव्यात तथ्य आढळले तर, एम.एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबतही गुढ उकलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एम.एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागेही नवीन कुमार गटाचाच सहभाग असावा असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.