या २ चिमुकल्या मुलींवर आली तशी वेळ कुणावरच येऊ नये, त्याला जगण्याच्या इच्छा शक्तीने हरवा...नाहीतर

 उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील एका सोसायटीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 

Updated: May 12, 2021, 01:17 PM IST
या २ चिमुकल्या मुलींवर आली तशी वेळ कुणावरच येऊ नये, त्याला जगण्याच्या इच्छा शक्तीने हरवा...नाहीतर

गाजियाबाद : उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील एका सोसायटीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका फ्लॅटमध्ये 6 जणांचे कुटूंब राहत होते. ज्यात दोन लहान मुली आहेत. या कुटूंबावर कोरोनाने घाला घातला. घरातील 4 जणांचा मृत्यू झाला आणि दोन्ही मुली फक्त वाचल्या. आता या मुली कोणाच्या भरवशावर राहतील याचा विचार करून सोसायटीवाल्यांचं काळीज तुटत आहे.

गाजियाबादच्या क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात दुर्गेश प्रसाद राहतात. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांचा होम आयसोलेशनवर उपचार सुरू होते. परंतु तब्बेत आणखी खालावल्याने 27 एप्रिल रोजी त्यांचा घरातच मृत्यू झाला. 

दरम्यान, त्यांची पत्नी, मुलगा, आणि सून देखील पॉझिटिव्ह झाले. तिघांना ग्रेटर नोएडाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुढे 4 मे रोजी दुर्गेश यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (5 मे) रोजी त्यांची पत्नी संतोष कुमारी यांनीही जीव गमावला. यानंतरही कोरोना विषाणू थांबला नाही. दर्गेश यांची सून निर्मला यांची 7 मे रोजी प्राणज्योत मालवली.

या पूर्ण हृदयद्रावक घटनेने सोसायटी तीव्र दुःखात आहे. परिसरात अत्यंत भितीदायक वातावरण आहे.  हसत्या खेळत्या कुटूंबात आता फक्त दोन लहान मुली आहेत.  मुलींना काही दिवस बरेलीत राहणाऱ्या त्यांच्या आत्याकडे पाठवण्यात आले आहे.