Go First Update : तुम्हीही विमानानं प्रवास करण्याला प्राधान्य देता आणि सातत्यानं विविध Airlines नं प्रवास करता तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. सध्याचा पर्यटनाचा काळ पाहता विमानप्रवास करत इच्छित स्थळी पोहोचणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, आता यातील अनेकांनाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण एका बड्या एअरलाईन्सनं पुढील दोन दिवसांसाठीची उड्डाणं पूर्णपणे रद्द केली आहेत.
वाडिया ग्रुपच्या गो फर्स्ट या विमान कंपनीनं दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. Go First नं आगामी दोन दिवसांची सर्व उड्डाणं रद्द केली असून त्यामुळं, बुकींग केलेल्या प्रवाशांची पंचाईत झाली आहे. विमान कंपनीकडे सध्या इंधन भरायलाही पैसे नाहीत, इतकी परिस्थिती ओढावली आहे. विमानांचं इंजिन बनवणारी अमेरिकन कंपनी प्रॅट अँड व्हिटनीने कंपनीचा इंजिन पुरवठाही अचानक थांबवला. त्यामुळं गो फर्स्टची जवळपास 28 विमानं जमिनीवर उभी करावी लागली आहेत. परिणामी कंपनीचा कॅश फ्लो अडला. ज्याचे थेट परिणाम इंधन खरेदीवर झाले असून, कंपनीकडे सध्या उरलेल्या विमानांचं इंधन घेण्याचेही पैसे नाहीत.
कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांनी इंधन देण्यास नकार दिला आहे. कंपनीने अचानक उड्डाणं रद्द केल्याने डीजीसीएने गंभीर दखल घेत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, 24 तासांत कंपनीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनीच्या माहितीनुसार ज्या प्रवाशांनी 3 ते 5 मे यादरम्यान विमानतिकीटांचं बुकींग केलं आहे त्यांना कंपनीकडून पूर्ण पैसे परत करण्यात येणाप आहेत. यासंबंधीची अधिकृत माहिती एका पत्रकाच्या माध्यमातून Go First नं दिली. जिथं लवकरात लवकर प्रवाशांना रिफंड करण्यात येणार असल्याचंही सांगितलं.
उड्डाणं रद्द झाल्याची बाब अधोरेखित करत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सेवा देणाऱ्या कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. शिवाय अडचणीच्या या प्रसंगी प्रवाशांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची हमीही दिली. यावेळी कंपनीकडून Refund साठीची संपूर्ण प्रक्रियाही सविस्तरपणे सांगण्यात आली.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ज्या प्रवाशांनी थेट एअरलाईन्सच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक केलं आहे त्यांना सोर्स अकाऊंटमध्ये रिफंड मिळणार आहे. तर इतरही मार्गांनी रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रवाशांना वेळोवेळी यासंदर्भातील माहिती देण्यात येईल. अशाच पद्धतीनं ज्यांनी ऑनलाईन ट्रॅवर अॅग्रीगेट किंवा तत्सम पद्धतीनं बुकींच गेलं आहे त्यांचेही पैसे सोर्स अकाऊंटमध्ये परत येतील. रिफंड न मिळाल्यास प्रवाशांनी सदरील संस्थेशी संपर्क साधावा. दरम्यान, इथं रद्द तिकीट नव्या तारखेवर कोणा दुसऱ्या एअरलाईन्समध्ये फिरवता येणार नसल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.