Sharad Pawar NCP Slams MVA Party UBT Shivsena Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपूर्वीच पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमधील भाषणात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
"लोकसभा निवडणूक लढवायची होती त्यावेळीच चित्र डोळ्यासमोर आलं. लोकसभा निवडणुकीत आपल्या अपेक्षा वाढल्या होत्या त्यामुळे अपेक्षा भंग झाला असं चित्र रंगवल जातं. मात्र तसं नाही. लोकसभा निवडणुकीत लोक आपल्या सोबत कुणी नव्हतं. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि मी म्हणालो फार फार तर काय होईल तर पराभव होईल परंतु त्यानंतर चित्र बदललं. त्यानंतर एक ठेच लागली त्यामुळे कुणी विचारधारेला तिलांजली देणार का? मागच्या चार-पाच दिवसापासून मर्जरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र गरज आपल्याला आहे की त्यांना आहे?" असा सवाल कोल्हे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन आपल्या भाषणातून उपस्थित केला. "लढण्याची खूमखुमी तेव्हाच जास्त असते तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं," असंही अमोल कोल्हे म्हणाले.
मित्र पक्षांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंनी, "राज्यातील परिस्थीत पाहिली तर शिवसेना अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. महाराष्टात 60 लाख लाडक्या बहीणींची संख्या कमी होणार आहेत. त्यामुळे आता आपल्याला लढायला संधी आहे," असंही विधान केलं. "स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पीपाणी चिन्ह नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मॅनिप्युलेशन होणार नाही," असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केली.
"गावागावात जर ग्रामसभेत ठराव करण्यात आला आणि त्यांनी बँलेट पेपरवर आणि मशीनवर पर्याय समोर ठेवा अशी भूमिका घेतली तर सुप्रीम कोर्टाला देखील पर्याय राहणार नाही. त्यासोबतच व्हीव्हीपॅट मशीनमधली चिठ्ठी आपल्या हातात आली पाहिजे अशी मागणी करायला हवी. ही मोहिम आपल्याला आगामी प्रजासत्ताक दिनापासूनच तयारी सुरू करुन राबवायला हवी. जर मागणी मान्य झाली नाही तर दबाव नक्कीच निर्माण होईल," असं अमोल कोल्हे म्हणालेत.
"वन नेशन वन इलेक्शन वेळी मतदान झालं त्यावेळी मशीनवर अनेकांचं मत नोंदवलं गेलं नाही. त्यावेळी सभापती यांनी आम्हाला कागदावर मत नोंदवण्याची परवानगी दिली. जर संसदेत हे मान्य होतं असेल तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का नाही?" असा सवालही अमोल कोल्हेंनी उपस्थित केला. "आता मरगळ झटकून टाका कारण पराभव हा आधी मनात होतो मग रणांगणांत पराभव होतो," असं अमोल कोल्हेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देताना सांगितलं. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असंही अमोल कोल्हेंनी भाषणाच्या शेवटी म्हटलं आहे.
अमोल कोल्हेंनी केलेल्या टीकेवरुन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, अमोल कोल्हेंनी आम्हाला कमी सल्ले द्यावेत असा खोचक टोला लगावला आहे.