नवी दिल्ली : चैत्र नवरात्रीचा सण सुरु आहे. या सणानिमित्त सोन्याची मागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीये. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोने दर प्रतितोळा ३१,५०० रुपयांवर पोहोचले. चांदीचे दरही ५०० रुपयांनी वाढून ते प्रतिकिलो ३९,५०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ तसेच डॉलर कमकुवत झाल्याने जगभरातील सोन्याच्या किंमतीत वाढ झालीये.
जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी सोन्याचे दर १.६० टक्क्यांनी वाढून १,३३१.८० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. चांदी २.३५ टक्क्यानी वाढत ते १६.५५ डॉलर प्रति औंसवर बंद झाले. याशिवाय नवरात्री असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणीही वाढली. यामुळे त्याच्या दरात वाढ झालीये.
दिल्लीमध्ये सोन्याचे दर ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर १५० रुपयांनी वाढत अनुक्रमे ३१,५०० आणि ३१,३५० रुपयांवर बंद झाले. मंगळवारी सोन्याचे दर ४० रुपयांनी कमी झाले होते.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही ५०० रुपयांची वाढ होत ते ३९,५०० रुपयांवर बंद झाले.