नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य कमी झाल्याने आणि अधिक मागणीमुळे बुधवारी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमतीत ३११ रुपयांची वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, भारतात रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
बुधवारी १० ग्रॅम सोन्याचा दर ३९,९३० रुपयांवरुन ४०,२४१ रुपयांवर पोहचला आहे.
सोन्याचा भाव वाढला असताना, मात्र चांदीच्या दरांत घसरण झाली आहे. बुधावारी चांदीचा दर ३६,४१६ रुपयांवरुन ३५,९४८ रुपयांवर पोहचला आहे. यादरम्यान चांदी ४६८ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारासह संपूर्ण जगभरातील व्यवहारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ ऍनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रुपायांत घसरण आणि सोन्याच्या अधिक मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
दरम्यान, जगभरात शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्याबाबत सावध आहेत. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळेच गुंतवणुकदारांनी सध्या व्यवहारांपासून दूर राहणं पसंत केलं आहे. अशा परिस्थितीत सोनं हा एकच पर्याय आहे, जिथे गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत.