मुंबई : दिवाळीच्या उत्साही दिवसांना सुरुवात झाली आहे. याच दिवसांपैकी एक अत्यंत महत्त्वाच्या अशा धनत्रयोदशीच्या दिवसी सोनं खरेदीचाच विचार अनेकांनी केला असेल. पण, तुम्हीही असा विचार करत असाल तर सोन्याचे दर लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर शुक्रवारच्या तुलनेत १ हजार रुपयांनी वाढला आहे.
शुक्रवारी सोन्याचा दर ३८, २५० रुपये इतका होता, तर शनिवारी हाच दर ३९ हजार ४२३ ते ३९ हजार ५५० रुपयांवर पोहोचला. ज्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही, हाच प्रश्न काहींना पडत आहे. मुख्य म्हणजे दरांचा हा आकडा वाढत असला तरीही यामध्ये खरेदी करणारेही काही कमी नाहीत.
सण- उत्सवांच्या या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राहकांची सोन्यासाठीची मागणी पाहता काही सवलती देण्यात आल्या आहेत. दागिन्यांची विक्री करणाऱ्या अनेक मोठ्या ब्रँडकडूनही कॅशबॅक, घडणावळीवर सूट अशा कैक सवलतींची ग्राहकांवर बरसात केली आहे.
सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे ३९,३८०; मुंबईत ३९,५५०; कोलकाता ३९,५१५ आणि चेन्नईमध्ये ३९,६४० इतके आहेत.
चांदीच्याही दरात वाढ
एकिकडे सोन्याचे दर वाढत असतानाच चांदीच्या दरांतही काही वाढ झाली आहे. १.२१ टक्क्याने हे दर वाढले असल्याचं कळत आहे. म्हणजेच आता चांदीचे दर प्रति किलोमागे ४६, ५५० रुपयांवर पोहोचली आहे.