मुंबई: २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने केला आहे. लंडन येथील या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर होते. यावेळी सय्यद शुजा याने म्हटले की, २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले होते. यानंतर झालेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही हा प्रकार घडला होता. दिल्लीतील २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता. परंतु, आम्ही वेळीच दुर्घटना रोखली. अन्यथा ही निवडणुकही भाजपने जिंकली असती, असे शुजाने म्हटले.
शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता. त्याने भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्स डिझाईन केली होती. ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने या ईव्हीएम मशिन्स उघडता येतात. २०१४ मध्ये भाजपने या ट्रान्समीटरचा वापर केला होता. यानंतरच्या काळात माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर हल्ले झाल्याचेही शुजाने सांगितले.