ओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा

राहुल गांधींच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट

Updated: Dec 5, 2017, 01:08 PM IST
ओखी वादळाचा गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही तडाखा title=

नवी दिल्ली : अक्राळ-विक्राळ ओखी वादळामुळे केवळ शहरं, समुद्र किनारपट्टी आणि शेतीलाच नव्हे तर, चक्क गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारालाही जोरदार फटका बसला आहे. गुजरातमधील किनारपट्टी आणि राज्यातील इतर ठिकाणचे वतावरण अचानक बदलले आहे. काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. तर, काही ठिकाणी आभाळात ढगांची दाटी झाली आहे. प्रचंड वेगाने वारेही वाहात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला मर्यादा पडत आहेत.

भाजपच्या सभा रद्द, कॉंग्रेसच्या सभांवर अनिश्चिततेचे सावट

भाजपचे अध्यक्ष अमित शाहांच्या तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. अमित शाह आज राजुला, महुवा आणि शिहोरमध्ये सभा घेणार होते. या वादळामुळे अहमदाबादमध्येही प्रचाराला झटका मिळणार तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही सुरतमधली सभा रद्द करण्यात आली आहे.दरम्यान, अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यावर पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आज गुजरातमध्ये होत आहे. मात्र, गुजरातमध्ये सध्या चक्रीवादळ आणि प्रचंड वेगाने वारे वाहात असल्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट आहे.

काही तासांमध्ये वादळ सुरतच्या दिशेनं सरकरणार

दरम्यान,  ओखी चक्रीवादळाचा प्रवास आता गुजरातच्या दिशेनं सुरू आहे. ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे. वादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे साडे तीनशे किलोमीटर अंतरावर तर गुजरातच्या किनाऱ्यापासून साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे. येत्या काही तासांमध्ये वादळ सुरतच्या दिशेनं सरकरणार असताना त्याचा जोर कमी होत जाईल असा अंदाज आहे. आज मध्यरात्रीनंतर ओखी वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी धडकेल असा अंदाज आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मुंबई आणि कोकण कोकणपट्टीवर दिवसभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार निवडणूक

गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतमोजनी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले आहेत. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात आहे.