नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाचव्यांदा देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींना लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची विनंती केली. लॉकडाऊन न वाढवल्यास भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.या बैठकीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी देशातील रेल्वेसेवा सुरु केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. रेल्वेसेवा ताबडतोब बंद करावी. तसेच ३१ मेपर्यंत विमानसेवाही बंद ठेवावी, अशी मागणीही तामिळनाडू व तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पुढचं आव्हान
दुपारी तीनच्या सुमारास सुरु झालेली ही बैठक रात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राने सर्व राज्यांना समान मदत केली पाहिजे. कोरोनाच्या काळात राजकारण करु नये, असा टोला ममतांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थित मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील खडतर आव्हानाची कल्पना दिली. आतापर्यंत भारताने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आगामी काळातही राज्यांनी आपल्या लक्ष्यापासून न ढळता सक्रियपणे काम केले पाहिजे. शहरातून गावापर्यंत कोरोना पोहोचू नये, याची काळजी घ्यायला पाहीजे. हे मोठे आव्हान आहे. लोक घराकडे निघाले आहेत हा मानवीय भाग आहे. घराकडे जाण्याची ओढ असते. लोक अडकल्यामुळे काही नियम शिथिल करावे लागले. परंतु ग्रामीण भागात कोरोना पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्या, असा सल्ला मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिला.