मुंबई : महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील भोंग्याचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशमध्ये देखील अजान भोंग्यावर होत असेल तर हनुमान चालीसा देखील भोंगावर पठण करण्यात आलं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आदेश काढला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर अजान भोंग्यावर होणं बंद झालं. लावलेले भोंगे तसेच बंद राहिले होते. कानपूरमध्ये अजान भोंग्यावर लावण्यासंदर्भात विरोध करण्यासाठी शनिवारी हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण भोंग्यावर करण्यात आलं.
जुलूस किंवा यात्रेसाठी लाऊडस्पीकर लावायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल तर धार्मिक स्थळांवर जिथे लाऊडस्पीकर आहेत त्या भागातून आवाज बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत.
कानपूरमध्ये मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो पण मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशानंतर या दिवशी चौकात हनुमान चालीसा पठण झालं नाही. तर त्या दिवशी अजानही भोंग्यावर झालं नाही.
जोपर्यंत भोंग्यावर अजान होईल तोपर्यंत हनुमान चालिसा पठणही भोंग्यावर होईल अशी घोषणा अभिमन्यू सक्सेना यांनी केली होती. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर त्यांचा सूर बदलला.
योगी आदित्यनाथ यांनी परवानगीशिवाय कोणत्याही नवीन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत असे आदेश दिले. त्यामुळेच मंगळवारी चौकाचौकात आयोजकांनी हनुमान चालीसा पाठ केला नाही. चौकाचौकांवरील लाऊडस्पीकर बंदच राहिले.
अभिमन्यू सक्सेना यांचे सूरही बदलल्याचं पाहायला मिळालं. आम्ही शिस्त पाळतो आणि आमच्याच सरकारने आदेश काढल्याने आम्ही भोंग्यावर हनुमान चालीसा पठण केलं नाही असंही ते म्हणाले. आम्हाला जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. अजानसाठीही नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं अभिमन्यू यांनी म्हटलं आहे.