हर्षद मेहताच्या पत्नीची वेबसाईट, 'त्या' घोटाळ्याचे गुपित उलगडणार!

एकेकाळी शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता यांच्या पत्नी ज्योती मेहता यांनी एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटवर ती आपल्या दिवंगत पतीची बाजू मांडणार आहे

Updated: Jul 8, 2022, 01:08 PM IST
हर्षद मेहताच्या पत्नीची वेबसाईट, 'त्या' घोटाळ्याचे गुपित उलगडणार! title=

मुंबई : एकेकाळी शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता यांच्या पत्नी ज्योती मेहता यांनी एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटवर ती आपल्या दिवंगत पतीची बाजू मांडणार आहे. त्यांनी म्हटलं की, या वेबसाईटवर 1992 च्या घोटाळ्याशी संबंधित सर्व बाजू मांडणार आहे. या घोटाळ्याने भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा दिला होता. 1992 साली सुमारे 4,000 कोटी रुपयांचा हा 'सिक्युरिटीज घोटाळा' भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरला होता.

हर्षद मेहता हा नोंदणीकृत आणि प्रसिद्ध ब्रोकर होता ज्याच्यावर अधिकाऱ्यांनी बँकिंग व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता.

काय म्हणाल्या मेहतांच्या पत्नी?

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, वेबसाइट लाँच करण्यामागील हेतू स्पष्ट करताना ज्योती मेहता म्हणाल्या, 'मीडिया, चित्रपट आणि वेब सिरीज यांनी त्यांना जिवंत ठेवले आहे त्यामुळे, सर्व तथ्य समोर ठेऊन त्यांचा बचाव करणे मी माझे कर्तव्य समजते. मी शोधलेली तथ्ये नाकारता येणार नाहीत, कारण त्यापैकी बहुतांश माननीय न्यायालये आणि न्यायाधिकरणांनी दिलेल्या आदेशांच्या स्वरूपात आहेत."

एसबीआयच्या अध्यक्षांनी घोटाळा नाकारला होताः ज्योती मेहता

वेबसाईटमध्ये असे म्हटले आहे की, एप्रिल 1992 मध्ये तत्कालीन प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या स्फोटक बातम्यांचा लेख, ज्यामध्ये 'घोटाळा' उघडकीस आला होता, त्याचे SBI चे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक या दोघांनी खंडन केले होते. त्यावेळचे आघाडीचे ब्रोकर असलेल्या हर्षद मेहता यांना खाली खेचण्याचा आणि भीती निर्माण करून 'उभरत्या शेअर बाजाराला खाली आणण्याचा' प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ज्योती मेहता यांनी केला.

ज्योती मेहता यांनी खेद व्यक्त केला की, 1993 पासून त्यांचे कुटुंब "टॅक्स टेररिजम" या सर्वात धोकादायक प्रकाराचे सर्वात मोठे बळी ठरले आहे. आमच्यावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे आरोप लावले गेले जे आयकर विभागाशी संबंधित नाहीत.'

मीडियाकडून बदनामी 

 "आयकर विभागाच्या अधिकारांचा घोर दुरूपयोग करण्यात आला. हर्षद मेहतांवरील आरोप सिद्ध झाले नाही'. तरीही, मीडियाद्वारे त्यांची बदनामी केली गेली.

2001 मध्ये ठाणे तुरुंगात झालेल्या पतीच्या मृत्यूमागे षडयंत्र असल्याचा आरोपही ज्योती मेहता यांनी केला. त्यांनी लिहिले की, "हर्षद पूर्ण स्वस्थ होते आणि वयदेखील फक्त 47 वर्ष इतके होते. यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता.

संध्याकाळी 7 च्या सुमारास पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले.' असा आरोपही ज्योती मेहता यांनी केला.