Crime News: 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला अन्...

Crime News Newly Married Woman Dead: मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या तरुणीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर या मुलीच्या नवऱ्याची नोकरी गेली आणि त्यानंतर तिचा छळ सुरु झाला असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

Updated: Mar 28, 2023, 10:07 PM IST
Crime News: 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला अन्...
Wedding Crime News

Haryana Crime News: हरियाणामधील बहादूरगढ येथे एका नवविवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद आवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. मरण पावलेल्या महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींनीच आमच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह फासावर लटकवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणामध्ये पोलिसांनी मृत महिलेच्या माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे या महिलेचा पती, सासू-सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. शाहपूर गावामध्ये हा प्रकार घडला असून अवघ्या 4 महिन्यांपूर्वी हसत हसत सासरी गेलेल्या मुलीचा फासाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून तिच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

हुंड्यासाठी छळ?

मरण पावलेल्या महिलेचं नाव पूजा असं असल्याचं समजतं. पूजा ही मूळची खरखोदा येथील राहणारी होती. पूजाचं लग्न 6 नोव्हेंबर 2022 रोजी बहादूरगढमधील नसीब नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. लग्न झालं तेव्हा नसीब एका हॉटेलमध्ये कामाला होता. मात्र नंतर काही कारणाने त्याची नोकरी गेली. याच कारणामुळे पुजाचा छळ केला जात होता अशी शंका तिच्या माहेरच्यांना आहे. पुजाने माहेरुन हुंडा आणावा म्हणून तिला सासरे लोक कायम टोमणे मारायचे असा आरोप पुजाची बहीण गीता हिने केला आहे. लग्नासाठी घेतलेलं कर्ज उतरवण्यासाठी बेरोजगार झालेला नसीब सुद्धा पत्नीवर माहेरुन लाखो रुपये आणण्यासाठी दबाव टाकत होता. अनेकदा नसीबने फोनवरुनही आपल्या सासूकडे पैसे मागितले होते. मात्र पुजाच्या माहेरच्या लोकांना पैशांची ही मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं.

अनेक तासांनी कळवलं

नसीबला पुजाबरोबर राहायची इच्छा नव्हती. त्याला पूजा आवडत नव्हती. त्याने अनेकदा तिला सोडण्याबद्दलही विधान केली होती. मात्र आपण तुला सोडण्याचा विचार करतोय हे कोणालाही कळता कामा नये अशी धमकीही त्याने पुजाला दिली होती, असा दावा गिताने केला आहे. पुजाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक तासांनी आम्हाला याबद्दल कळवण्यात आल्याचा आरोपही पुजाच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

पोलिस काय म्हणाले?

या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक पोलिस अधिकारी रविंद्र कुमार यांनी प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचं सांगितलं. पुजाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आयपीसीच्या वेगवगेळ्या कलमांअंतर्गत पुजाच्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनंतरच पुजाच्या मृत्यूच्या कारणाचा अंदाज येईल आणि पुढील कारवाई होईल असं सांगण्यात आलं आहे.