चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे क्रांतिकारी निर्णय घेत असल्याचं दिसत आहे. हरियाणा सरकार १२ वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या, दोषीला थेट फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करणार आहे.
धक्कादायक म्हणजे हरियाणात गेल्या आठवड्याभरात बलात्काराच्या ९ घटना घडल्या. यापैकी तीन घटना गुरुवारी झाल्या.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले, 'गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमुळे मी प्रचंड दुखावलो आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहोत. जर 12 वर्षाखालील बालिकेवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावण्यात यावी, असा कायदा आम्ही करणार आहोत.'
मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी, बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर केलं होतं.
मुख्यमंत्री खट्टर यावर आणखी बोलताना पुढे म्हणाले. 'घटना पडताळून पाहिल्याशिवाय जी सनसनी केली जाते, ती होता कामा नये, या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक लवकरच विधानसभेत आणणार आहे'.
20 वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचं समोर आलं, तर बीए सेंकड इयरच्या विद्यार्थिनीवर चालत्या गाडीत दोघांनी गँगरेप केला होता. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका दलित विद्यार्थिनीला घराबाहेरुन पकडून चौघांनी तिच्यावर चाकूच्या धाकाने बलात्कार केला.