मुंबई : भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं नेटवर्क मानलं जातं. दररोज कित्येक कोटी लोकं रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. भारतीय ट्रेन काही स्थानकांवर ट्रेन थांबते, तर अनेक स्थानकांवरून गाडी पुढे जाते.
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही रेल्वे स्थानकांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रेन थांबताच प्रवाशांचा श्वासही थांबतो. याचं कारण म्हणजे या स्थानकांवर भुताटकी असल्याचं मानलं जातं. अशी देशातील कोणती स्टेशनं आहेत हे आज आपण जाणून घेऊया.
भुताटकी स्थानकांच्या यादीत पहिलं नाव उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील नैनी जंक्शनचं आहे. हे स्टेशन बऱ्याच काळापासून पछाडलेलं असल्याचे मानलं जातं. या रेल्वे स्थानकाजवळ नैनी जेल आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना या तुरुंगात कैद करण्यात आल्याचं म्हटलं जातं. तिथे त्यांच्यावर खूप अत्याचार झाले. त्यांचा आत्मा नैनी स्थानकात फिरत असतो, असंही मानण्यात येतं.
नैनी स्टेशन व्यतिरिक्त आंध्र प्रदेशच्या चित्तूर रेल्वे स्टेशनवरही भूताटकी असल्याचं म्हणतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफ जवानाचं भूत या स्थानकाभोवती फिरतं. या तरुणाला या स्थानकावर जमावाने एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्याचा आत्मा न्यायासाठी भटकतो.
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकही पछाडलेलं मानलं जातं. या स्थानकावरून अनेकांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला आहे. पण आवाजाच्या दिशेने गेल्यावर तिथे कोणीच दिसत नाही.
पश्चिम बंगालमधील पुरुलियाच्या बेगुनकोडोर रेल्वे स्थानकाला भूतिया असंही म्हणतात. यामुळे 42 वर्षे हे स्थानक बंद ठेवण्यात आलं होतं. पण ते 2009 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आलं.
याशिवाय हिमाचल प्रदेशच्या बडोग रेल्वे स्थानकाला भुताटकी असल्याचं म्हणतात. हे स्थानक अतिशय सुंदर रेल्वे मार्गासाठी ओळखलं जात असलं तरी, हे स्थानक बांधणाऱ्या ब्रिटीश अभियंता कर्नलचा आत्मा याठिकाणी फिरत असल्याचं म्हणतात.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही.)