नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एक महत्त्वपूर्ण विधन केले आहे. आपण आणि बहिण प्रियंका गांधी-वड्रा यांनी वडिलांच्या मारेकऱ्यांना केव्हाच माफ केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सिंगापूर येथे आयआयएम अल्युमनाईसोबत बोलताना राहुल गांधी यांनी शनिवारी हे विधान केले. राजीव गांधी यांच्या हत्येमुळे आम्ही प्रचंड व्यथित आणि हैराण झालो होतो. अनेक वर्षे आम्ही प्रचंड नाराज होतो. मात्र, आम्ही वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यापाठीमागे विशिष्ट घटना, शक्ती, संघटना असतात. मला आजही आठवते की, प्रभाकरण याला मी टीव्हीवर मृत आवस्थेत पाहिले तेव्हा, दोन गोष्टी माझ्या मनात आल्या. पहिली म्हणजे टीव्हीवर त्यांना इतक्या अपमानीत केले जात आहे. दुसरे असे की, त्यांच्या मुलांना काय वाटत असेल हा विचार करून मलाही वाईट वाटत होते.
दरम्यान, २१ मे १९९१मध्ये तामिळनाडू येथील एका निवडणूक प्रचारात लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळी इलम या संघटनेच्या एका महिलेने आत्मघातकी बनून स्वत:ला उडवून दिले. ज्यात राजीव गांधींचा मृत्यू झाला.