इथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम

HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत

मानसी क्षीरसागर | Updated: May 29, 2024, 01:17 PM IST
इथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम title=
hdfc bank to stop sms alerts for some upi transections

HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. अलीकडेच बँकेने ग्राहकांसाठी नवीन अपडेट शेअर केली आहे. बँकेच्या ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश (SMS) प्राप्त होणार नाहीत. बँकेच्या या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी होणार नाहीये. तर, जुन महिन्याच्या 25 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

एचडीएफसीने बँकेकडून ग्राहकांना ही माहिती देण्यात आली आहे. बँकेने म्हटलं आहे की, 25 जून 2024पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेत काही बदल करण्यात येणार आहे. जर तुम्ही युपीआयच्या माध्यमातून 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवत आहात. तरच, तुम्हाला एसएमएस अलर्ट पाठवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, तुम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त करत आहात, तरंच तुम्हाला एसएमएस अलर्ट पाठवण्यात येतील. हे बदल फक्त एसएमएस अलर्टसाठीच असणार आहेत. 

ईमेल अलर्टबद्दल काय म्हणतेय बँक?

बँकेने पुढे स्पष्ट केले आहे की, ईमेल अलर्टवर कोणतेही बदल करण्यात येणार नाहीयेत. ग्राहकांना सर्व ट्रांजेक्शनवर पहिल्या प्रमाणेच ईमेल अलर्ट मिळणार आहेत. बँकेने सर्व ग्राहकांना त्यांचे ईमेल अपडेट करण्यास सांगितले आहे. तसंच, ईमेल अपडेट करण्यासाठी बँकेने सर्व ग्राहकांना एक लिंकदेखील पाठवली आहे. 

आत्तापर्यंत HDFC बँकेकडून ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर SMS पाठवते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कोणतेही पेमेंट करता किंवा तुमच्या खात्यात कुठूनतरी पैसे प्राप्त करता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लगेच एसएमएस येतो. हा व्यवहार 10 रुपयांचा असला पूर्वी एसएमएस येत होते. मात्र आता ही प्रणाली बंद होणार असून पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होणार आहे.

गेल्या काही वर्षांतील UPI व्यवहारांची सरासरी पाहिली तर ती कमी होत आहे. 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत 1648 रुपये होता, जो 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत 1515 रुपये झाला. म्हणजे सुमारे आठ टक्के कपात झाली आहे. परंतु  अल्प प्रमाणात UPI चा वापर वाढला आहे, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये UPI द्वारे व्यवहारांची संख्या 11.8 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कमी पैशाच्या व्यवहारांसाठी पाठवलेले मेसेज हे फारसे उपयुक्त नाहीयेत, अशा प्रकारचे फिडबँक आम्हाला ग्राहकांनी पाठवलेले आहे. कारण, UPI पेमेंटसाठी वापरलेले ॲप्स देखील असे अलर्ट पाठवत असतात. त्यामुळंच असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, जास्तप्रमाणात टेक्स्ट मेसेजसाठी 0.01-0.03 रुपये इतका खर्च येतो. UPI व्यवहारांची सरासरी दररोज 40 कोटी रुपये इतका खर्च येतो. बँक फक्त एसएमएस टेक्स्ट मेसेजसाठी दिवसाला काही कोटी रुपये खर्च करत असतात.