नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एका महाठगाचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केला आहे. हा ठग मुलींना भुलविण्यात पटाईत होता. तो शरीराने भलताच काटकुळा होता. त्याला आपल्या काटकुळ्या शरीराचा कमीपणा वाटत असे. आपला काटकुळेपणा लपविण्यासाठी तो चक्क आपल्या शरीरावर ४ ते ५ शर्ट वापरत असे. इतकेच नव्हे तर, कोणाला कळू नये, यासाठी तो अंगावर कोटही वापरत असे. त्याने दोन-तीन मुलींना आपल्या जाळयात ओढले. एका प्रकरणात तर श्रीमंत कुटुंबातील मुलीसोबत खोटे प्रेमसंबंध निर्माण करत लग्न करण्याचाही घाट घातला. मात्र, आरके पुरम येथील एका मोठ्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी फसवाफसवी केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याचे बिंग फुटले.
प्रकरण पश्चिम दिल्लीतील आहे. डीसीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अटक केलेल्या ठगाचे नाव तरूण पोद्दार (वय २४) असे आहे. मुळचा बिहारमधील दरभंगा येथील असलेला हा तरूण राणी बाग परिसरात राहात होता. पोलिसांनी त्याच्या जवळून दोन लॅपटॉप, एक मोबाईल फोन, एका बड्या कंपनीचे नकली ओळखपत्र, आठ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, आठ सिम कार्ड आणि दोन पुस्तके ताब्यात घेतली आहेत. या महाभागाने या पुस्तकांवरही मुळ लेखकांचे नाव बदलून त्या जागी आपले नाव छापले होते.
पोलिसांनी सांगितले की, जनकपुरी येथे राहणाऱ्या एका महिलेकडून त्याने आरके पुरम येथील शाळेत मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी ८.५० लाख रूपये घेतले होते. त्याने त्या महिलेला मुलाला प्रवेश मिळाल्याचा बनावट मेलही पाठवला होता. महिला जेव्हा मुलाला घेऊन शाळेत गेली तेव्हा, तिला कळले की, मुलाला प्रवेशच मिळाला नाही. आपण फसवलो गेलो आहोत. महिलेने २९ मेरोजी जनकपुरी पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रार मिळताच गुन्हा दाखल करून घेतला. अखेर अनेक ठिकाणी छापे आणि सायबर विभागाने कसून तपास केल्यावर या महाठगाचा पत्ता लागला. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा, त्याने आपले एकेक कारनामे सांगितले. मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आपल्या काटकुळ्या शरीराचा अडथळा येतो, असा त्याला कमिपणा वाटत असे. त्यामुळे तो ४ ते ५ शर्ट वापरत असे. तसेच त्यावर कोटही घालत असे. मुलींना पटविण्यासाठी आलीशान गाड्या आणि दोन बॉडिगार्डही हायर करण्यापर्यंत त्याची मजल पोहोचली होती.
एका महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश करून देण्याच्या प्रकरणात तो अडकला आणि त्याचा भांडाफोड झाला. दरम्यान, हा तरूण सोशल मीडियावरही प्रचंड कार्यरत होता. फेसबुक आणि युट्युबवर त्याने अनेक व्हिडिओ आणि पोस्टही शेअर केल्या होत्या. त्याने मूळ लेखकाचे नाव बदलून एक पुस्तकही ऑनलाईन विक्रिसाठी ठेवले होते. त्याने कॉम्प्यूटर सायन्समध्ये बीएससी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याने आजवर अनेकांना चुनाही लावला असल्याचे पोलिसांनी सांगितले.