एक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल

संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करुन एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केला आहे, यात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Updated: Jan 27, 2023, 08:32 PM IST
एक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल

Asian Tiger Mosquito : मच्छरांमुळे (Mosquito) मलेरिया (Maleria), डेंग्यू (Dengue), चिकनगुनियासारखे (Chikungunya) आजार होतात. त्यामुळे मच्छर पळून लावण्यासाठी आपण घरात मच्छर मारणाऱ्या बॅटपासून मच्छर अगरबत्तीपर्यंत अनेक साधनांचा वापर करतो. मात्र हे मच्छर इतके शक्तीशाली झालेत की आता मच्छर अगरबत्ती किंवा लिक्विडसुद्धा निष्प्रभ ठरू लागलंय. विषेश करून डेंगूला आमंत्रण देणाऱ्या टायगर मच्छरनं (Asian Tiger Mosquito) अक्षरश: धुमाकूळ घातलाय. जपानच्या संशोधकांनी (Japanese researchers) मच्छरांवर संशोधन करून एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केलाय. 

या अहवालानुसार गेल्या काही वर्षात मच्छरांमधली रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढलीय. मच्छर मारणाऱ्या औषधांचा कोणताही प्रभाव या मच्छरांवर दिसून येत नाही. टायगर मच्छरांमुळे डेंगूच्या रूग्णांची संख्या जवळपास 8 पटीने वाढलीय असाही दावा जपानी संशोधकांनी केलाय. मच्छर मारणाऱ्या औषधांमुळे मच्छारांची रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या मच्छारांवर अगरबत्ती किंवा मच्छर मारणाऱ्या औषधांचाही परिणाम होत नाही.

डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया सारखे आजार पसरवणारे टायगर मच्छर आता जास्तच धोकादायक बनले आहेत. जपानच्या तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार मच्छर मारण्यासाठी आपण औषध फवारतो. पण मच्छरांमध्ये असलेल्या अॅण्टीबॉडीजमुळे या औषधांचा काही परिणाम त्यांच्यावर होत नाही. आशियातल्या वेगवेगळ्या ठिकाणी टायगर मच्छरांवर रिसर्च करण्यात आला आहे. यात टायगर मच्छरांची प्रतिरोधक क्षमता हजार पटीने विकसीत झाल्याचं समोर आलं आहे. 

WHO च्या दाव्यानुसार डेंग्यू हा जगातील 10 सर्वात मोठ्या आजारांपैकी एक आहे. टायगर मच्छरच्या चाव्यामुळे जर्मनीत राहणारा एक 27 वर्षीय मुलगा कोमात गेला होता. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार मच्छर साधारण रात्रीच्या वेळेत चावतात. पण टायगर मच्छर दिवसाही आढळून येतात. धक्कादायक म्हणजे हे मच्छर माणसांचं रक्त तर पितातच, पण प्राण्यांचंही रक्त शोषून घेतात. त्यामुळे टायगर मच्छरांना जंगली मच्छरही म्हटलं जातं. 

हे मच्छर दक्षिण पूर्व एशियात आढळतात. याशिवाय युरोपीय देशांमध्येही काही ठिकाणी हे मच्छर आढळून आले आहेत. भारतात साधारणत: एडिज एजिप्टी मच्छर चावल्याने डेंग्यू होत असल्याची प्रकरणं आहेत. पण टायगर मच्छरमुळेही डेंग्यू होत असल्याचं समोर आहे.  त्यामुळे मच्छर पळवण्यासाठी तुम्ही घरात अगरबत्ती जाळून निश्चिंत होत असाल तर सावधान...कारण टायगर मच्छर तुमचं टेन्शन वाढवू शकतो.