Himachal Pradesh Election Result : हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) सध्या अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस 39 तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन अपक्ष उमेदवारही आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांनी विजय मिळवला आहे. सिराज येथून जयराम ठाकूर यांनी विजय मिळवत नवा विक्रम केला आहे.
एकाच मतदार संघातून सहावेळा जिंकण्याचा विक्रम जयराम ठाकूर यांनी केला आहे. याआधी हिमाचलमध्ये कोणत्याही उमेदवाराला सलग 6 वेळा विजय मिळवता आला नव्हता. मंडी जिल्ह्यातील सेराज मतदारसंघातून ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या चेतराम ठाकूर यांचा 20 हजार मतांनी पराभव केला आहे.
दुसऱ्यांदा कॉंग्रेसच्या त्याच उमेदवाराचा पराभव
गेल्या निवडणुकीत 2017 मध्ये जयराम ठाकूर हे विजयी होत मुख्यमंत्री झाले होते. 2017 मध्ये ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या चेतराम ठाकूर यांचा 11 हजार 254 मतांनी पराभव केला. 1998 मध्ये पहिल्यांदा या जागेवरुन ते विजयी झाले होते. त्यानंतर सलग सहा वेळा त्यांनी विजय मिळवला आहे.
2022 च्या निवडणुकीत एकूण 84 हजार 315 मतदारांनी मतदान केले आहे. भाजप, काँग्रेस आणि आप यांच्याशिवाय सीपीआय-एमकडून महेंद्र सिंह, बहुजन समाज पक्षाकडून इंदिरा देवी आणि नरेंद्र कुमार हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
कोण आहेत जयराम ठाकूर?
जयराम ठाकूर हे मंडी जिल्ह्यातील तांदी गावातील आहेत. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी गावातल्या सरकारी शाळेत घेतले. 1987 मध्ये त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण हे पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे घेतले. यादरम्यान, त्यांनी अभाविपमध्ये प्रवेश केला.
ठाकूर यांनी 1993 मध्ये 27 व्या वर्षी पहिल्यांदा मंडीच्या चेच्योट (आताचे सेराज) मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा 1951 मतांनी पराभव झाला. त्यानंतर 1999 मध्ये त्याच जागेवरुन निवडणूक लढवत जिंकली.
हिमाचलमध्ये नवीन मुख्यमंत्री?
मात्र सेराजची जागा जिंकल्या नंतर जयराम ठाकूर यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. सध्याच्या आकडेवारीवरुन भाजपला सत्ता मिळवण्यासाठी अपक्षांची मदत लागण्याची शक्यता आहे. मात्र अपक्ष होशियार सिंह आणि के एल ठाकूर हे जयराम ठाकूर यांच्या नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदल्याची शक्यता असल्याची चर्चा हिमाचलमध्ये सुरु आहे.