कोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच? अदानी ग्रुपसोबत नेमकं कनेक्शन काय?

Hindenburg Research : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचा करिअर ग्राफ पाहिला असता त्यांनी फक्त भारतातच नाही तर परदेशी कंपन्यांमध्ये देखील काम केले आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच कशा बनल्या सेबीच्या प्रमुख... जाणून घेऊया त्यांची कारकिर्द...

वनिता कांबळे | Updated: Aug 11, 2024, 10:42 PM IST
कोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच? अदानी ग्रुपसोबत नेमकं कनेक्शन काय?  title=

Madhabi Puri Buch Profile Hindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आता हिंडेनबर्गने आरोप केले आहेत. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचं अदानी ग्रुपसोबत कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अदानींच्या मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर फंडामध्ये माधबी पुरी बुच यांचा हिस्सा

अदानींच्या मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर फंडामध्ये माधबी पुरी बुच यांचा हिस्सा आहे. ज्या देशात कमी कर लागतो अशा देशातल्या कंपनीतून सेबीच्या प्रमुखांची कंपनी अदानी ग्रुपचे शेअर विकत घेत होती. सेबीच्या प्रमुखांची कंपनी या माध्यमातून लाखो करोडो रुपयांचा फायदा वसूल करत होती.

आयसीआयसीआय बँकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या माधबी पुरी बुच यांचा करिअर ग्राफ

माधबी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. 2022 पासून त्या या पदावर आहेत. माधबी पुरी बुच यांनी तिचे शालेय शिक्षण मुंबईतील  फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि  कॉन्व्हेंट ऑफ जीसस मेरी स्कूल, नवी दिल्ली येथून  झाले.  यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी शिक्षण पूरर्ण केले. तर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीएची डिग्री घेतली.  1989 मध्ये आयसीआयसीआय बँकेतून त्यांनी करिअरची सुरुवात केली. इन्व्हेस्टमेंट बँकर, कार्यकारी संचालक अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. 1993 ते 1995 दरम्यान, माधबी पुरी बुच या इंग्लंडमधील वेस्ट चेशायर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. 12 वर्षात त्यांनी अनेक कंपन्यांच्या विक्री, विपणन आणि उत्पादन विकास विभागात काम केले. 2006 ते 2011 पर्यंत त्यांनी ICICI सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून काम केले. 2011 मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये त्यांनी वरिष्ठ पदावर काम केले. 2013 ते 2017 पर्यंत त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार म्हणून काम केले.  2017 मध्ये, त्यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 मध्ये, त्यांनी सहारा समूहाविरुद्ध एक आदेश पारित केला होता. सेबीच्या आदेशाचे उल्लंघन करून पूर्णपणे परिवर्तनीय डिबेंचरद्वारे गुंतवणूकदारांकडून उभारलेले 14 हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. 2022 मध्ये त्यांनी सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.