नवी दिल्ली : एम्समधील डॉक्टर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर कोरोना व्हायरस किती दिवस राहतो, याच्या अभ्यास करणार आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग शरीरात किती काळ राहू शकतो आणि तो संसर्ग पसरवू शकतो की नाही, याबाबत अध्ययन करण्याची योजना आखत आहेत.
दिल्ली रुग्णालयातील फॉरेन्सिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासामुळे व्हायरस मानवी अवयवांवर कसा परिणाम करतो? हे देखील शोधण्यास मदत होऊ शकते.
या अध्ययनासाठी मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडून त्यांची संमती मिळविली जाईल. या अध्ययनात रोग विज्ञान आणि अणुजीव विज्ञान यांसारखे आणखी इतर अनेक विभाग सामिल होणार आहेत.
अशाप्रकारचं हे पहिलंच अध्ययन असल्याने याची योजना अतिशय सावधगिरीने तयार करण्यात येणार असल्याचं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. या अभ्यासामुळे व्हायरस शरीरावर काय परिणाम करतो हे समजण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासोबतच कोरोना व्हायरस मृतदेहावर किती काळापर्यंत राहू शकतो, याबाबतही समजण्यास मदत होणार आहे.
आतापर्यंत अस्तित्त्वात असलेल्या वैज्ञानिक साहित्यानुसार, मृत शरीरात विषाणूचा हळू-हळू अंत होतो. परंतु अशा मृत शरीरास संसर्गमुक्त घोषित करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा सांगण्यात आलेली नाही.
'आयसीएमआर'ने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित मृतदेहावर, कोणत्याही चिर-फाडशिवाय शवविच्छेदन करण्याऱ्या तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या फॉरेन्सिक पोस्टमार्टमसाठी चिर-फाड तंत्राचा वापर करु नये. कारण शवगृहातील कर्मचाऱ्यांनी अत्यधिक सावधगिरी बाळगूनही, जर मृतदेहातील कोणत्याही प्रकारचा द्रव स्त्राव एखाद्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यास, अशा कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धोका ठरु शकतो.