Husband Wife Relation : लग्न झाल्यानंतर नवरा असो किंवा बायको, दोघांचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जातं. लग्नाला आयुष्याची नवीन इनिंग म्हणतात. प्रत्येकाला लग्नानंतर आपलं आयुष्य सुखी समाधानी राहावं असं वाटत असतं. मात्र, अनेकदा दोघांच्या किंवा कुणा एकाच्या चुकीने वैवाहिक जीवन पूर्णपणे उध्वस्त होतं. लग्नानंतर नवरा बायकोत लहानसहान भांडणं होणं स्वाभाविक आहे. मात्र, यामध्ये प्रत्येक वेळेस नवऱ्याचीच चूक असेल असं नाही. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात एक बायको म्हणून महिलांनी आपल्या नवऱ्यासोबत कसं वागायला हवं.
असं अनेकदा पाहिलं जातं की, बायको आपल्या नवऱ्याची इतरांसोबत तुलना करते. पुरुषांना आपल्या बायकोने आपल्याला कुणाशी कम्पेअर करणं अजिबात आवडत नाही. अशाने नवरा आणि बायकोमधील नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. बायकोची ही सवय नवऱ्याच्या जिव्हारी लागू शकते. म्हणूनच महिलांनी याबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येक माणसामध्ये असणारे गुण आणि दोष वेगवेगळे असतात. दुसरा व्यक्ती कितीही चांगला असला तरी तो तुमच्या नवऱ्याची जागा घेऊ शकत नाही.
लग्नानंतर सुरुवातीला बायको आपल्या नवऱ्याला अगदी राजासारखी वागणूक देते. खरंतर हे पूर्णपणे चुकीचं आहे. यानंतर बायको गरजेपेक्षा जास्त डिमांडिंग होत असेल तर ते चुकीचं आहे. यामुळे तुमच्या नात्यात टेन्शन वाढू शकतं, दुरावा निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं आर्थिक गणित पाहणं गरजेचं आहे. आर्थिक गणित पाहून भविष्यातील गरजांसाठी पैसे सेव्ह करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे अधिक डिमांडिंग असणं चुकीचं आहे.
कोणतंही नातं हे विश्वासाच्या जोरावर फुलतं, अधिक घट्ट होतं. अशात नवरा आणि बायकोमध्ये एकदुसऱ्याबाबत विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नवरा बायकोचं नातं हे आयुष्यभरासाठीचं नातं असतं. अशात जर नवरा बायकोवर किंवा बायको नवऱ्यावर प्रत्येक लहानसहान गोष्टीत संशय घेत असेल तर ही शंकेची पाल तुमचं नातं गढूळ करू शकते. अनेकदा बायको आपल्या नवऱ्याचा फोन तपासते. आपला नवरा कोणत्या महिलेशी बोलतोय? बोलतोय तर काय बोलतोय? हे सातत्याने पाहात राहिल्याने विश्वासावर उभ्या नात्यामध्ये भेगा निर्माण होऊ शकतात. म्हणून संशयाच्या या सवयीला लवकरात लवकर सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
(Disclaimer: या लेखातील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर लिहिली आहे. याचा वापर करताना याबाबत योग्य व्यक्ती किंवा संस्थांकडून पडताळणी करून घेणं गरजेचं आहे. Zee 24 Taas याबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. )