Lockdown Affect : 15 दिवसांपासून उपाशी! भुकेने व्याकूळ झालेल्या आई आणि 5 मुलांची ही अवस्था

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे उपासमार 

Updated: Jun 17, 2021, 09:34 AM IST
Lockdown Affect : 15 दिवसांपासून उपाशी! भुकेने व्याकूळ झालेल्या आई आणि 5 मुलांची ही अवस्था  title=

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे हाल झालेत. अशा परिस्थितीत एक अतिशय मन हेलावणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 6 लोकं गेल्या 15 दिवसांपासून चक्क उपाशी होते. याबाबत कुणाला काहीच कल्पना नव्हती. 

एनजीओ हँड्स फॉर हेल्थ  (NGO Hands For Health) च्या टीमने या सगळ्या लोकांना रेस्क्यू केलं आहे. यामध्ये एका महिलेचा आणि पाच मुलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब ही आहे की, गेल्या 15 दिवसांपासून हे सगळे उपाशी होते. 

एनजीओच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही त्या पीडित कुटुंबांना पाहिलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे लोकं भूकेने इतके व्याकूळ झाले होते की, त्यांच्यात बोलण्याची शक्ती नव्हती. एनजीओने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर सगळ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 

या घटनेनंतर त्या परिसरातील रेशन डिलर विरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर महिलेने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. 2020 मधील लॉकडाऊनच्या अगोदरच तिचे पती विजेंद्र कुमार यांचं आजाराने निधन झालं. ज्यानंतर कुटुंबियांना सांभाळण्यासाठी महिलेने एका फॅक्टरीत 4 हजार रुपयांची नोकरी केली. आताच्या लॉकडाऊन दरम्यान फॅक्टरी बंद झाली आणि तिची होती ती नोकरी देखील गेली. 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार,त्यांच्या घरात जेवणासाठी एक अन्नाचा कण देखील नव्हता. संपूर्ण कुटुंब गेल्या 15 दिवसांपासून उपाशी आहेत. महिलेचा 20 वर्षीय तरूण मुलगा मजुरीचं काम करत असे. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याचीही नोकरी गेली. 

कोरोनाचा हा काळ सगळ्यांनासाठीच खडतर होता. या परिस्थितीत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली. तर अनेकांनी खडतर परिस्थितीचा सामना केला आहे.