Advocate Renu Sinha Murder: नोएडा येथे सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 61 वर्षीय रेणु सिन्हा यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुममध्ये आढला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. रविवारी नोएडा सेक्टर 30 मधील D-40 कोठीत हा सगळा प्रकार घडाल होता. यानंतर नातेवाईकांनी रेणु सिन्हा यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. रेणु सिन्हा यांच्या पतीनेच हत्या केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला होता. पण तो मात्र फरार असल्याने पोलिसांनी शोध सुरु केला होता.
रेणु सिन्हा यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. पोलीस रेणु सिन्हा यांच्या पतीचा शोध घेत असतानाच कोठीमधील स्टोअर रुममध्ये तो लपून बसल्याचं समोर आलं. पोलिसांना अखेर त्याला शोधण्यात यश आलं आहे. हत्येनंतर मागील 24 तासांपासून पती स्टोअर रुममध्येच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास करत आहेत.
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता समोर धक्कादायक चित्र होतं. याचं कारण रेणु सिन्हा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तसंच आजुबाजूलाही सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. हे चित्र पाहिल्यानंतर एकच आरडाओरड सुरु झाली होती. पोलीसही हा हत्याकांड पाहून चक्रावले होते. रेणु सुन्हा सुप्रीम कोर्टातील वकील असल्याने अनेक मोठे पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते आणि तपास सुरु केला होता.
रेणु सिन्हा यांच्या हत्येनंतर नातेवाईकांनी तिच्या पतीनेच हत्या केल्याचा आरोप केला होता. पण हत्येनंतर पती फरार होता. पोलीस त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होती. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावरच संशय होता. यादरम्यान पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतलं आहे.
हत्येनंतर आरोपी पती कोठीमधील स्टोअर रुममध्ये लपून होता. पोलिसांनी मध्यरात्री 3 वाजता त्याला ताब्यात घेतलं. गेल्या 24 तासांपासून तो तिथेच लपून होता अशी माहिती आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.
दरम्यान पोलिसांनी सांगितलं आहे की, जास्त रक्त वाहून गेल्याने रेणु सिन्हा यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल. नातेवाईकांनी मात्र पतीच रेणु सिन्हा यांच्या मृत्यूला कारणीभूत असावा असा थेट आरोप केला आहे. दरम्यान, पोलीस सध्या वेगवेगळ्या लोकांचे जबाब नोंदवत आहे. तसंच घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीत कोठीवरुन वाद सुरु होता. या कोठीचा 4 कोटींमध्ये व्यवहार झाला होता. ज्यामुळेच पतीने ही हत्या केली आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. रेणु सिन्हा यांच्या भावाने पोलिसांकडे धाव घेत बहिण फोन उचलत नसल्याने शंका उपस्थित केली होती. दरम्यान पोलीस दरवाजा तोडून घरात घुसले होते. यावेळी शोध घेतला असता बाथरुममध्ये रेणु सिन्हा यांचा मृतदेह पडलेला होता. रेणु यांच्या कानाजवळ जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी संशय असल्याने रेणु सिन्हा यांच्या पतीला फोन केला असता, तो बंद होता. यानंतर हा संशय बळावला होता. दरम्यान, पोलिसांनी रेणु सिन्हा यांच्या पतीला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे.