Bride Became A Mother: मोठ्या थाटामाटात लग्न झाले. सासरच्यांनी वाजतगाजत सुनेला घरात घेतले. लग्नानंतर चार दिवस सगळं काही सुरळीत सुरू होते. मात्र, लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधुच्या पोटात दुखायला लागलं. कळा असह्य झाल्यानंतर घरातील सगळेच घाबरले. त्यांनी वधुला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे गेल्यावर कळलं की तरुणी गर्भवती असून तिला प्रसूती वेदना सुरू आहेत. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच हादरली.
आठवड्याभरापूर्वी जिला लग्न करुन आणलं तिनेच विश्वासघात केल्याने पती सून्न होऊन बसला होता. 15 ऑक्टोबर रोजी तरुणीने गोंडस लेकीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर महिलेचा पती व सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला होता. त्यांनी लगेचच महिलेच्या आई-वडिलांना बोलवून घेतले. 16 ऑक्टोबर रोजी महिलेला व तिच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पती बायकोला व नवजात मुलीला घेऊन घरी गेला.
महिलेच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई-वडिलांना आधीच या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यानुसार तेदेखील आधीच घरी पोहोचले होते. घरी गेल्यानंतर पतीने महिलेच्या वडिलांना तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. तसंच, आमची फसवणूक केल्याचा आरोपही केला. तुमची मुलगी गरोदर असल्याचे तुम्ही लपवले त्यामुळं मी तिला व तिच्या मुलीला नांदवू शकत नाही. तुम्ही तिला घरी घेऊन जा, अशा शब्दात त्याने महिलेला स्वीकारण्यास नकार दिला.
जावयाच्या या निर्णयाने महिलेच्या आई-वडिलांना एकच धक्का बसला. त्यांनी मुलीला स्वीकारण्याची गळ घातली मात्र, पती ऐकायलाच तयार नव्हता. अखेर नेमकं काय प्रकरण या बाबच महिलेला विचारणा करण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की लग्नाच्या आधी तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये शारीरक संबंधही निर्माण झाले होते. त्यामुळं ती गरोदर झाली. मात्र घरच्यांच्या भीतीने तिने कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही.
मुलीचे सत्य कळल्यानंतर तिचे आई-वडिल तिला तिच्या प्रियकराच्या घरी घेऊन गेले. मात्र, त्यानेही तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी त्याच्या घराबाहेरच आंदोलन करण्यास सुरुवात केली तसंच, पोलिसांनाही बोलवण्यात आले. महिलेच्या आईने पोलिसांना सगळी हकिकत सांगीतली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर पंचायत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रियकराने महिलेला व तिच्या आईला पोलीस कप्लेंट न करण्याची विनंती केली होती. तसंच, पंचायत जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही त्याने म्हटलं होतं. पंचायतीत महिलेचा पती, प्रियकर आणि अन्य लोक उपस्थित होते. महिलेच्या पतीनच तिचे व प्रियकराचे लग्न करुन द्यावे, यासाठी पुढाकार घेतला. तसंच, तिला तीन तलाक देत प्रियकरासोबत निकाह करण्यास सांगितले.