बांसवाडा : जर ठरवलं तर आपण कोणत्याही वेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ होऊ शकतो, असा दावा सिने-अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी केलाय. परंतु, आपल्याला मुख्यमंत्री पदी बसण्याची हौस नाही... कारण त्यामुळे आपण स्वातंत्र्य गमावू, अशी भीतीही त्यांना वाटतेय. राज्यस्थानच्या बांसवाडा दौऱ्यावर आलेल्या हेमा मालिनी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. हेमा मालिनी या उत्तरप्रदेशातील मथुरेतून भाजपच्या खासदार आहेत.
अभिनेत्री की खासदार? दोन भूमिकांपैंकी कोणती भूमिका जास्त भावते, असा प्रश्न विचारला असता त्यांनी अजिबात वेळ न दवडता त्यांनी म्हटलं की, मला जी काही ओळख मिळालीय ती केवळ बॉलिवूड अभिनेत्री म्हणून... तसंच मथुरेच्या नागरिकांनी काम करण्याची संधी दिलीय तर खासदार म्हणून काम करणंही आवडतं, असंही त्यांनी म्हटलंय.
आत्तापर्यंत मथुरेत जितकं काम झालं नसेल तेवढं काम आपण गेल्या चार वर्षांत केल्याचा दावाही हेमा मालिनी यांनी केलाय. मोदी सरकारच्या कामाबद्दल बोलताना, नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान सापडणं कठिण असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी, राजस्थानच्या सुंदरतेची स्तुतीही त्यांनी केली.