देशातील प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात, तेव्हा टीना डाबी (IAS Tina Dabi) यांचं नाव घेतलं जातं. गेल्या महिन्यात राजस्थानच्या बारनेरमध्ये जिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यापासून त्या अॅक्शन मोडमध्ये असून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही वेळा त्या त्यांनीच सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून रस्ते झाडताना दिसतात, तर कधी रुग्णालयाच्या तपासणीत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या डॉक्टरांना फटकारताना दिसतात. या सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बुधवारी सकाळी टीना डाबी यांनी एका स्पा सेंटरवर धाड टाकली. या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचा आरोप होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ स्वच्छता मोहीम सुरू असताना अचानक टीना डाबी अचानक तपासणीसाठी पोहोचल्या होत्या. तपासणीदरम्यान, टीना डाबी यांना एक स्पा सेंटर दिसले ज्याचे दरवाजे आतून बंद होते. त्यांनी अधिकाऱ्यांना हे दरवाजे उघडण्यास सांगितलं. मात्र अनेकदा दार ठोठावूनही कोणीच दरवाजा उघडला नाही.
यादरम्यान संशय वाढल्याने पोलीस छतावरुन स्पा सेंटरमध्ये पोहोचले. तर काहींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. स्पा सेंटरमध्ये अनेक खोल्या होत्या, ज्यामध्ये पाच मुली आणि दोन पुरुष आक्षेपार्ह स्थितीत सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर पोलीस ठाण्याने या सर्वांना देहविक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतलं असून या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. धाड टाकण्यात आलेली ही सर्व कारवाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत स्पामधील महिला, पुरुष आपला चेहरा लपवताना दिसत आहेत.
बारमेर शहरात अनेक स्पा सेंटर आहेत. स्थानिकांनी अनेक स्पा सेंटर्सची प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या स्पा सेंटर्सवर बेकायदेशीर कृत्य केली जात असल्याचा आरोप आहे. आज टाकण्यात आलेला छापा ही पोलिसांनी केलेली पहिली प्रभावी कारवाई आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ही केंद्रे चालवणाऱ्यांना कामगार विभागाकडून परवाना दिला जातो. यानंतर ते पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधून मुली आणतात आणि स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवतात. या बेकायदेशीर स्पा सेंटर्सवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. पण नियमित कारवाई होत नसल्याने हे लोक जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा या कामाकडे वळतात.
टीना डाबी यांनी "नवो बारमेर" म्हणजे नवीन बारमेर असा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.